वैभववाडी प्रतिनिधी :
तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मौदे येथील विवाहित तरुणाचा मृतदेह अरुणा धरणाच्या बाजूला आखवणे अवघडाचा व्हाळ येथे आढळून आला. योगेश दत्ताराम कदम वय २४ रा.मौदे कदमवाडी असे त्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला. योगेश कदम याचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र पत्नी त्याच्याकडे राहात नव्हती. तो आई वडिलांसोबत मौदे कदमवाडी येथे राहात होता. तो मोलमजुरीची कामे करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. शनिवारी सकाळी मोलमजुरीच्या कामाला जातो असे सांगून गेला मात्र सायंकाळी तो घरी परत आला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची खबर त्याचा भाऊ याने वैभववाडी पोलीस ठाणेत दिली होती. गेले तीन दिवस त्याची सगळीकडे शोधाशोध सुरु होती. सोमवारी सकाळी अरुणा नदीच्या दोन्ही बाजूने ग्रामस्थ शोधत असताना अवघडाचा व्हाळ या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला. ग्रामस्थांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. याबाबत वैभववाडी पोलीस ठाणेत माहिती देण्यात आल्यानंतर वैभववाडी ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील, पोलीस हवालदार रणजीत सावंत, हरीश जायभाय, दीपक कानसे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आणण्यात आला. या ठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.












