दिग्गजांच्या मुलाखतीतून मिळाले उद्योजकतेचे धडे
रत्नागिरी : भविष्यात खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगात मोठी संधी असल्याने त्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक दीपक गद्रे केले. तसेच इन्फिगो आय केअर हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसमवेत नाभिक, हॉटेल व्यवसाय, प्रसूतिगृह यामध्येही उद्योग संधी असल्याचे सांगितले. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात महामार्ग, बोट व विमान वाहतुकीतून पर्यटन व्यवसायाला मोठी संधी असल्याचे सांगितले. याशिवाय विविध प्रकारच्या रंग, रसायन उद्योगांमध्ये भविष्यात मोठी संधी असल्याचे अमोघ केमिकल्सचे श्रीपाद खेर यांनी सांगितले.
अंबर हॉलमध्ये आयोजित कऱ्हाडे ब्राह्मण बेनव्होलंट फाउंडेशनच्या (केबीबीएफ) ग्लोबल मीटमधील परिसंवादामध्ये उद्योजकांनी आपापले अनुभव सांगत नव उद्योजकांना मार्गदर्शन केले. कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये यश मिळवणाऱ्या प्रसाद देवस्थळी यांनी त्यांना बोलते केले.
या वेळी दीपक गद्रे म्हणाले की, कोणत्याही कर्मचाऱ्याला एक चूक करण्याची मुभा आहे, पण तीच तीच चूक सारखी करू नये. प्रत्येक माणसाने आपल्या व्यवसायांमध्ये आज जे काय आहे त्यात उद्या काहीतरी नवीन बदल होण्याची शक्यता आहे, ते झालं तर आपण काय करायचं याचा विचार नेहमी केला पाहिजे.
डॉ. ठाकुर म्हणाले की, उद्योग करताना संकटे आली तर त्यातून सुधारण्यासाठी आपल्याकडे कौशल्ये असली पाहिजेत. त्यातून परिपक्वता विकसित होत असते. एखादे यश मिळाले की आपले कौतुक होते, पण अपयश आल्यावरही आपण जबाबदारी घ्यावी लागते. मी २७५ हॉस्पीटल्स देशभरात उभी केली. पण त्यातली ५-६ बंद करावी लागली. त्यामुळे प्रत्येक वेळेसच यश मिळते असं नाही. सतत बदलत राहिले पाहिजे, शिकत राहिले पाहिजे.
अमोघ केमिकल्सचे श्रीपाद खेर म्हणाले की, मी केमिस्ट म्हणून एका कंपनीत ५ वर्षे काम केले. पण बढती न मिळाल्याने कंपनी सोडली त्यावेळी व्यवस्थापकाने तू काम करून घेऊ शकत नसल्याने बढती मिळाली नाही. त्यामुळे दुसऱ्या कंपनीत गेलास तरी केमिस्टच राहशील, असे सांगितले. त्यावेळी मला प्रथम माझ्यातली कमतरता समजली. दुसऱ्या कंपनीत ही चूक सुधारली. रासायनिक कंपनी, त्यातून उत्सर्जन होणारे सांडपाणी, धूर, वायू, नागरी वस्ती किती दूर आहे, याचा विचार करावा लागतो. त्याप्रमाणे गुजरातमध्ये कंपन्या उभ्या केल्या.












