रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून सरकारी मोजणीच्या खाणाखूणा नष्ट केल्या

संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रत्नागिरी | प्रतिनिधी :

ग्रामपंचायतीच्या रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून फिर्यादीच्या चारचाकी वाहनचा रस्ता अडविला. तसेच सरकारी मोजणीच्या खाणाखूणा नष्ट केल्याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 22 जून रोजी सकाळी 7 वा.सुमारास शिरगाव येथे घडली.

रविंद्र वैजनाथ दामले (रा.शिरगाव,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पुष्कर माधव दामले (57, रा.मुळ रा.शिरगाव, रत्नागिरी सध्या रा.डोंबिवली पूर्व,ठाणे) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी संशयित रविंद्र दामलेने फिर्यादीला पाहून ग्रामपंचायतीने काढलेले गेट मी परत लावले. तुला माहित आहे कलेक्टर माझा माणूस असून तू इथून जिवंत कसा जातोस ते मी पाहतो अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या कुटुंबाच्या मिळकतीमध्ये बेकायदेशिरपणे लोखंडी गेट व गडगा बांधला. त्याचप्रमाणे शिरगाव ग्रामपंचायतीच्या रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून फिर्यादीच्या चारचाकी वाहनाचा रस्ता अडवून सरकारी मोजणीच्या खाणाखूणा नष्ट केल्या. याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 126(2),238,329(3),351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.