मिशन कॅम्प ते गवळीवाडा जाणार्‍या रस्त्यावर 539 ग्रॅम गांजासह एकाला घेतला ताब्यात

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील मिशन कॅम्प ते गवळीवाडा जाणार्‍या रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका संशयिताला 539 ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले. गांजाची किंमत 15 हजार असून इतर साहित्य असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार 25 जून रोजी करण्यात आली.
जहिर मेहमूद काजी (45,रा.गवळीवाडा,रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक शहरातील मिशन कॅम्प ते गवळीवाडा जाणार्‍या रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अभिलेखावरील संशयित गुन्हेगार हा तिथे दुचाकीवर बसून संशयित हालचाली करत असताना त्यांना दिसून आला.
या पथकाला त्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी व त्याची झडती घेतली. तेव्हा त्यांना त्याच्या जवळील पिशवित हिरवट काळपट रंगाचा व उग्र वासाचा 539 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ मिळून आला. संशयित जहिर काजीला पुढील कारवाईसाठी शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ,पोलिस उपनिरीक्षक ओगले,पोलिस हवालदार शांताराम झोरे,बाळू पालकर,अमित कदम,योगेश नार्वेकर,यागेश शेट्ये व महिला पोलिस हवालदार वेष्णवी यादव यांनी केली.