नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, नऊ जण गंभीर जखमी

टरबूज रस्त्यावर सांडल्याने वाहतूक कोंडी; पोलिसांनी मार्ग मोकळा केला

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आणे गावाजवळ नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात घडला. टरबूज वाहतूक करणाऱ्या पिकअप ट्रक आणि समोरून येणाऱ्या एसयूव्हीची जोरदार धडक झाली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.


पुणे : नगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील आणे गावाजवळ बुधवारी रात्री उशिरा पिकअप ट्रक आणि एसयूव्हीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अहिल्यानगर जिल्ह्यातील ५५ वर्षीय तुकाराम मधे यांचा मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टरबूज घेऊन मुंबईकडे जाणारा पिकअप ट्रक रात्री सुमारे ११.१५ वाजता आणे गावाजवळ पोहोचला असताना आळे फाटा बाजूकडून येणाऱ्या एसयूव्ही वाहनाशी त्याची जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांतील एकूण दहा प्रवासी जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पिकअप ट्रकमधून प्रवास करणाऱ्या तुकाराम मधे यांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत.

या धडकेमुळे पिकअपमधील टरबूज रस्त्यावर सांडले आणि महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला आणि लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.