हिट अँड रन प्रकरणातील संशयित पुणे येथून ताब्यात

बांदा पोलिसांची धडक कारवाई

बांदा : प्रतिनिधी
हिट अँड रन प्रकरणात भरधाव वेगात कार चालून दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ (रा . डेगवे) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालक  राहुल शरद कुबल (४०, रा. पुणे) याला बांदा पोलिसांच्या पथकाने  पुणे-बाणेर येथून गुरुवारी अटक केली. तसेच त्याची अपघातग्रस्त डस्टर कार (एमएच १२ जीएम २८०९) ताब्यात घेण्यात आली. सदर अपघात मुंबई गोवा महामार्गावर सटमटवाडी येथे २७ एप्रिल रोजी झाला होता.

मयत उत्तम पडवळ हे दुचाकीने येत असताना कारने दुचाकीला पाठीमागून धडक देत तब्बल १०० मीटर फरफटत नेले होते. या अपघातात सेवानिवृत्त एसटी बस चालक उत्तम पडवळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. बांदा पोलिसात अज्ञात कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांदा पोलीस कार चालकाच्या मागावर होते. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपी कार चालकाचा शोध घेतला.

कार चालक पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बांदा पोलिसांच्या पथकाने त्याला पुण्यातून शिताफिने ताब्यात घेतले. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिताकांत नाईक, हवालदार धनंजय नाईक, सुशांत हेर्लेकर यांचा समावेश होता. चालक कुबल याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला शुक्रवारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले.