उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडून या प्रकल्पाचे भरभरून कौतुक
प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करू; वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला ना. उदय सामंत यांची सदिच्छा भेट
चिपळूण (प्रतिनिधी) : आम्ही सांघिकपणे दुग्ध व्यवसाय क्षेत्रात काम केले. तर वाशिष्ठी डेअरी प्रकल्प प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नव्हे तर देशात आदर्शवत प्रकल्प ठरेल, अशा शब्दात या प्रकल्पाचे कौतुक राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी करताना या प्रकल्पासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही शुक्रवारी या प्रकल्पाला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी ना. उदय सामंत यांना या प्रकल्पाची इंत्यभूत माहिती दिली. शिवाय ना. सामंत यांनी देखील या प्रकल्पाच्या वाटचालीची सखोल माहिती जाणून घेताना या प्रकल्पाचे भरभरून कौतुक केले.
यापूर्वी दोन दिवसांपूर्वी ना. उदय सामंत यांचे बंधू लांजा- राजापूरचे आमदार किरण सामंत यांनीही या डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. त्यानंतर शुक्रवारी खुद्द ना. उदय सामंत यांनी या प्रकल्पाला सदिच्छा भेट देत डेअरीतील कार्यपद्धती, उत्पादने आणि वितरण व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, उद्योजक केतन पवार, माजी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, युवासेना तालुका अधिकारी निहार कोवळे, सुयोग चव्हाण, शहानवाज शाह, पिंपळीचे सरपंच दादा देवरुखकर, वाशिष्ठी डेअरीचे संचालक प्रशांत वाजे, महेश खेतले, अविनाश गुडेकर, रमण डांगे, डेअरीचे सरव्यवस्थापक लक्ष्मण खरात, व्यवस्थापक प्रदीप मगदूम आदी उपस्थित होते. यावेळी ना. उदय सामंत यांनी दुग्ध प्रकल्पाविषयी प्रशांत यादव यांच्याकडून माहिती घेतांना शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरे उपलब्धतेसाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. तरच येथील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळेल. दुधाचे प्रमाण वाढले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना सांगताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन कार्यकर्त्यांनी या प्रकल्पासाठी ब्रँड अँबेसिडर व्हा, असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले. तसेच दक्षिण रत्नागिरीत हा प्रकल्प पुढे तेथील शेतकऱ्यांच्या हाताला काम देण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांच्याशी संवाद साधताना स्पष्ट केले.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ना. उदय सामंत यांनी सुरुवातीलाच दक्षिण रत्नागिरीत दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी त्या दृष्टीने आपण येथे आलेलो आहोत, असे सांगताना, प्रशांत यादव यांनी डेअरीचा मोठा प्रकल्प उभा केलेला आहे. या प्रकल्पाचे आपल्या हस्ते उद्घाटन झाले, याचा आपल्याला आनंद आहे. हा प्रकल्प याहीपेक्षा मोठा झाला पाहिजे, अशी आपली भावना आहे. दक्षिण रत्नागिरीत दूध संकलन सुरू झालेले नाही, ते कशा पद्धतीने सुरू करता येईल. या संदर्भात आपण यादव यांच्याशी चर्चा करीत आहोत. या प्रकल्पाचे अल्पावधीतच ६५ ते ७० दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर स्पर्धा करणारे हे पदार्थ असून आपल्याला खरोखरच अभिमान आहे. याबद्दल यादव यांचे खरोखरच मनापासून कौतुक करतो असे ना. सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते आणखी पुढे म्हणाले की, रत्नागिरीत वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचा प्लांट सुरू करण्यास आपण यादव यांना सांगितले आहे. ते सकारात्मक देखील आहेत. उद्योगमंत्री म्हणून आपण या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. हा प्रकल्प ८ ते १० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात ३० ते ४० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत, असे यादव यांना आपण सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या संघर्षाबाबत ना. उदय सामंत यांना पत्रकारांनी विचारले असता राजकारणातील संघर्ष हा इतरांसारखा आपण वैयक्तिक घेत नाही. निवडणुकीत हार-जीत होत असते. संघर्ष होत असताना ते जिंकले असते. तरी आपण येथे आलो असतो. प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. यादव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लढत दिली. ६ हजार मते कमी पडली, त्यावेळी कमी मते पडली, असे सांगून सूचक वक्तव्य करून सर्वांना बुचकळ्यात टाकले. यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.












