दापोली मतदार संघात कॉंग्रेसला (आय) धक्का

 विधानसभा क्षेत्राध्यक्ष समद मांडलेकर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत पक्षप्रवेश
 प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत

मंडणगड (प्रतिनिधी) : काँग्रेस (आय) या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेलेल दापोली विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष समद मांडलेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी कोलाड येथे दि. २८ जून रोजी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत पक्षप्रवेश केला.
कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रवादीचे माजी जि. प. सदस्य प्रकाश शिगवण, रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष राकेश साळुंखे, मंडणगड तालुका युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, नगरसेवक सुभाष सापटे, नगरसेवक हरेश मर्चंडे, दिशा समिती सदस्य सतिष दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. समद मांडलेकर यांच्यासमवेत मुनिम मुकादम, अश्फाक मांडलेकर यांच्यासह म्हाप्रळ परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. समद मांडलेकर यांनी मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथून कॉंग्रेस पक्षाचा युवा कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरवात केली. त्यांनतर त्यांची कॉंग्रेसच्या मंडणगड तालुका युवक अध्यक्षपदी नियुक्ती झाली. पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषवले. मांडलेकर यांनी काँग्रेस पक्षाचे तालुका तसेच जिल्हा पातळीवर समर्थपणे काम करत पक्ष वाढविला आहे. दापोली मतदार संघातील तीनही तालुक्यात, जिल्ह्यात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. त्यांच्या कामाचा धडाका पाहून कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दापोली विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुकी करण्यात आली होती. त्यामुळे समद मांडलेकर यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश हा दापोली मतदार संघात कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर राष्ट्रवादीला त्यांच्या संघटनात्मक अनुभवाचा फायदाच होईल असे बोलले जात आहे. या निमित्ताने आयोजीत स्वागत समारभांत उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सर्वसमावेषकतेचा नवा विचार व नव्या अपेक्षासंह पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची भुमिका असून यासाठी पक्षाशी जोडणाऱ्या जुन्या नव्या सहकाऱ्यांचे सन्मानाने स्वागत आहे. या निमीत्ताने पत्रकारांशी संवाद साधताना समद मांडलेकर म्हणाले की, आगामी काळात मतदार संघात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेततृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी व जनहितासाठी काम करणार आहे.
फोटो फाईल- सीपीएन२८-६
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करताना काँग्रेसचे दापोली विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष समद मांडलेकर व अन्य.