मंडणगडात दोन – तीन दिवस पावसाची संततधार कायम

आंबडवे – राजेवाडी मार्गावरील तुळशी घाटात रस्त्यावर ठिकठिकाणी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली.
तुळशी घाटात ठिकठिकाणी रस्त्यावर दरड

मंडणगड : प्रतिनिधी – मंडणगड मध्ये पावसाची मागील दोन – तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे शनिवारी ( 16 ऑगस्ट ) सकाळच्या दरम्यान आंबडवे – राजेवाडी महामार्गावरील तुळशी घाटात ठिकठीकाणी रस्त्यावर दरड आल्याने या मारागावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली. दरम्यान, तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्या सूचनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे.

आंबडवे ते राजेवाडी या राष्ट्रीय महामार्गाच्या नुतनीकरणात तालुक्यातील तुळशी घाटाचे मागील वर्षी रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे नव्याने रुंदीकरण करण्यात आलेल्या या घाटातील दरड कोसळण्याचा सिलसिला गत वर्षाच्या पावसाळ्यात पाहायला मिळाला. यंदाही या घाटात अनेक ठिकाणी रस्त्यावर दरड येण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनाक्रमांत सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र अपघाताच्या शक्यता नाकारता येत नसल्याने या घाटातील दरडप्रवण क्षेत्रात कायम स्वरूपी उपापयोजना करण्याची मागणी प्रवासी, वाहतूकदार यांच्यावतीने केली जात आहे.