कोट्यावधींचे नुकसान
राजापूर | प्रतिनिधी
नाटे बाजारपेठ शनिवार दिनांक 29/06/2025 च्या मध्यरात्री हादरली. मध्यरात्री 12.30 वाजताचे सुमारास नाटे बाजारपेठेतील व्यापारी इमारतीस भीषण आग लागली आणि एकच खळबळ उडाली
राजेश दत्ताराम पावस्कर (राहणार धावूलवल्ली) यांचे मालकीचे ही इमारत होती. इमारतीला आग लागल्याने इमारतीमध्ये असलेले दुकान गाळ्यातील सामान व दुकानगाळे जळून नुकसान झालेले आहेत
या भीषण आगीत इमारतीतील गाळा नंबर एक ला असलेले दिगंबर गिजम यांचे उपहारगृह , गाळा नंबर दोन मधील भीम खंडी चायनीज सेंटर, गाळा नंबर तीनमधील प्रदीप सहदेव मयेकर यांचे टेलरिंग शॉप, गाळा नंबर चारमधील केदार मधुकर ठाकूर यांचे कापड आणि प्लास्टिक दुकान, गाळा नंबर पाचमधील प्रसाद सदाशिव पाखरे यांचा फोटो स्टुडिओ, गाळा नंबर सहा येथील निकिता नारायण गोसावी यांचे ब्युटी पार्लर, गाळा नंबर सातमधील नारायण गोसावी यांचे कटलरी साहित्याचे गोडाऊन यांना आगीने आपल्या लपेट्यात घेऊन आगीमध्ये दुकान गाळ्यातील साहित्य व दुकान गाळे यांचे नुकसान झालेले आहे.

सुदैवाने हा व्यापारी गाळा असल्याने सदर इमारतीत नागरिक वास्तव्यास नाहीत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक, नाईट चेकिंग अमलदार व पोलीस ठाण्यातील उपलब्ध अमलदार लागलीच घटनास्थळी हजर झाले .तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून खाजगी गाड्यांनी पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान राजापूर नगरपालिकेची अग्निशामक दल गाडीसह घटनास्थळी आल्यानंतर लागलेली आग पहाटे चार वाजता आटोक्यात आलेली आहे.
सदर आगीत मालमत्तेचे मोठे आर्थिक नुकसान तर झाले आहेच पण सात गाळ्यात होणारे व्यवसाय आगीत भस्मसात झाले आहेत. यामुळे येथील व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पंचनाम्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते.










