गोगावलेंनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन : महेश सारंग

खा. नारायण राणेंवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आक्रमक

सावंतवाडी: कुडाळ येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले आहेत. येत्या आठ दिवसांत गोगावले यांनी जाहीर माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिला आहे. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महेश सारंग म्हणाले, “मंत्री भरत गोगावले यांनी खासदार नारायण राणे यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केले आहे, ज्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. गोगावले राणे साहेबांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल अपुऱ्या माहितीच्या आधारावर बोलत आहेत. शाखाप्रमुख, नगरसेवक, मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा विविध महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या व्यक्तीवर बोलताना त्यांनी भान ठेवून बोलायला हवे होते. आपण महायुतीमध्ये आहोत, याचेही भान त्यांना राहिले नाही. राणेंवर केलेल्या या विधानामुळे भाजपचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.” असे ते म्हणाले.

सारंग पुढे म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्हा घडवण्यात नारायण राणे यांचा सिंहाचा वाटा आहे. कोकणच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. राज्यभर त्यांनी आपली ताकद निर्माण केली असताना, अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करून मंत्री गोगावले यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकला आहे. आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आहोत. मंत्री गोगावले यांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ७० टक्के जागा लढवण्याबद्दल गोगावले जे वक्तव्य करत आहेत, ते अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे शक्य होणार नाही. जिल्ह्यात भाजपची स्वतःची ताकद आहे आणि कार्यकर्ते स्वबळावर लढण्यास इच्छुक आहेत. आम्ही यापूर्वी महायुतीचे काम केले आहे. एकीकडे राज्यात महायुती भक्कम असताना, अशा प्रकारची वक्तव्ये करून त्यांनी उगाच वाद निर्माण करू नयेत, असेही सारंग यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, माजी नगरसेवक उदय नाईक, गुरु मठकर, मधुकर देसाई, उमेश पेडणेकर, अमित गवंडळकर, नागेश जगताप आदी उपस्थित होते.