सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत हद्दीतील मळेवाड-कोंडुरे अंगणवाडीच्या नूतन इमारतीचा शानदार शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. इमारतीच्या जुन्या छपरातून गळती होत असल्याने नवीन इमारतीची तातडीने गरज होती.
या इमारतीसाठी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्वरित निधी उपलब्ध करून दिला होता. त्यावेळी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, मनीष दळवी, आणि तत्कालीन बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांनी निधी मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला होता.
या शुभारंभप्रसंगी मनीष दळवी यांनी फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून नवीन इमारतीचे उद्घाटन केले. आपल्या मनोगतात दळवी यांनी गावातील जीर्ण इमारती आणि शाळांच्या छपरांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींनी तत्पर असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, आणि सदस्यांनी अंगणवाडीची सुसज्ज इमारत उभारून लहान मुलांची सोय केल्याबद्दल दळवी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी अधिक निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी सरपंच सौ. मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, कविता शेगडे, सानिका शेवडे, महेश शिरसाट, अर्जुन मुळीक, अमोल नाईक, पोलीस पाटील राजाराम मुळीक, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, रोजगार सेवक अमित नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष सौ. दर्शना शिरसाठ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, सीआरपी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपसरपंच हेमंत मराठे यांनी केले.












