सांडवे येथे शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचे प्रशिक्षण
शिरगाव (प्रतिनिधी) – रासायनिक खताचा वाढता खर्च आणि जमिनीचा ऱ्हास ही शेती समोरील गंभीर आव्हाने होत चालले आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नैसर्गिक कृषी निविष्ठांचा सातत्याने वापर करणे गरजेचे आहे अशा निविष्ठांचा वापर केल्याने जमिनीची सुपिकता वाढते व उत्पादनात वाढ होते आणि शेती शाश्वत कडे वाटचाल करते असे मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली चे उमाकांत पाटील यांनी सांडवे येथे केले.
कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस व आत्मा, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने “नैसर्गिक कृषी निविष्ठांची निर्मिती व वापर” या विषयावर जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम देवगड तालुक्यातील सांडवे येथे संपन्न झाले.
या प्रशिक्षण सत्रात कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषयतज्ज्ञ डॉ. विलास सावंत यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या निविष्ठांची माहिती, त्यांची शेतात निर्मिती व वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सह्याद्री वाहिनीवरील आपल्या नैसर्गिक शेतीविषयक मुलाखतीची व्हिडिओ क्लिपही उपस्थित शेतकऱ्यांना दाखवली.
कुवळे येथील प्रगतिशील शेतकरी श्री अरुण कोदे यांनी स्वतःचा सेंद्रिय शेतीतील अनुभव मांडला. त्यांनी बाजारातून खते व औषधे विकत घेण्याऐवजी ती निविष्ठा शेतावरच तयार करणे अधिक फायदेशीर असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रशिक्षणात शिरगाव मंडळ कृषी अधिकारी डॉ. बी एम लांबाडे यांनी नैसर्गिक खते व औषधे तयार करण्याविषयी माहिती सादर केली यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी अमोल ईडोळे, समाधान सकपाळ,सचिन पडधन, स्वप्नील गोटे आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या सहभागातून जिवामृत, दशपर्णी अर्क, लमित्त, लमिअ व निमास्त्र (निमार्क) या निविष्ठांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या प्रात्यक्षिकांना शेतकरी वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी प्रत्यक्ष सहभागातून नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याची प्रक्रिया अनुभवली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा देवगडचे श्री निकेतन राणे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्तावनेतून कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी कणकवली उमाकांत पाटील,कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे डॉ. विलास सावंत सर, सांडवे गावचे माजी सरपंच श्री बाबल मसुरकर, श्रीमती नीलिमा मसुरकर, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री विजय मसुरकर, शिरगाव मंडळाचे कृषी अधिकारी डॉ. बी.एम. लांबाडे, अमोल ईढोळे, सचिन पडघन, एस.व्ही. सपकाळ, स्वप्नील गोटे तसेच परिसरातील शेतकरी, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी सांडवे मसूरकरवाडीतील शेतकरी, पुरुष व महिलांचे सहकार्य लाभले
शेवटी श्री विजय मसुरकर यांनी गावकऱ्यांतर्फे उपस्थित मान्यवरांचे आभार मानून प्रशिक्षणाची सांगता झाली.
फोटो कॅप्शन: सांडवे येथे शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले












