मात्र पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण; हवामान विभागाचा अंदाज
रत्नागिरी : कोकणात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप अपेक्षित जोरदार पावसाची सुरुवात झालेली नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस कोकण व गोव्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील १५ जूनपर्यंतची पर्जन्यमान आकडेवारी पाहता यंदा पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी पिछाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
हवामान विभागाच्या १४ जून रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रगतीसाठी महाराष्ट्रात वातावरण अनुकूल असून पुढील चार ते पाच दिवसांत राज्यातील आणखी काही भागांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात १४ ते २० जूनदरम्यान तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून १४ आणि १६ जून रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकणात १४ ते १७ जूनदरम्यान उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्जन्यमान अहवालानुसार १५ जून २०२६ रोजी केवळ १.२१ मिमी पावसाची नोंद झाली. १ जून ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण ५९८.९४ मिमी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या केवळ १.९८ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. तालुकानिहाय आकडेवारीत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १५९.८५ मिमी, तर गुहागरमध्ये १४२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याउलट मंडणगडमध्ये केवळ ८.७५ मिमी, खेडमध्ये २१.३१ मिमी आणि दापोलीत २८.२४ मिमी पाऊस झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाबोध पर्जन्यमान नोंदीनुसारही जिल्ह्यातील स्थिती फारशी वेगळी नाही. या नोंदीनुसार १ जून ते १५ जूनपर्यंत जिल्ह्यात ७२४.२० मिमी पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरीच्या २.३९ टक्के इतका आहे. या आकडेवारीत रत्नागिरी तालुक्यात १५५.४० मिमी, राजापूरमध्ये १४५.६० मिमी आणि गुहागरमध्ये १०८.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये १७.४० मिमी तर खेडमध्ये १२.१० मिमी पाऊस झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस लक्षणीयरीत्या कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. १५ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यात २७१३.९५ मिमी पाऊस झाला होता, तर यंदा त्याच कालावधीत तो केवळ ५९८.९४ मिमी इतका आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ७८ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. गेल्या वर्षी १५ जूनपर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या ८.९६ टक्के पाऊस झाला होता, तर यंदा तो केवळ १.९८ टक्क्यांवर आहे.
तालुकानिहाय तुलना केली असता रत्नागिरी तालुक्यात गेल्या वर्षी ३९९.३७ मिमी पाऊस झाला होता, तर यंदा १५९.८५ मिमीच झाला आहे. गुहागरमध्ये २८९ मिमीच्या तुलनेत १४२.२० मिमी, दापोलीत ३१५.६६ मिमीच्या तुलनेत २८.२४ मिमी, लांज्यात ३४९.४० मिमीच्या तुलनेत ७०.६० मिमी आणि राजापुरात ३२३.९९ मिमीच्या तुलनेत ७६.४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मान्सूनची सुरुवात यंदा तुलनेने संथ असल्याचे चित्र दिसत आहे.
तथापि, हवामान विभागाने महाराष्ट्रात मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे नमूद केले असून, पुढील काही दिवसांत कोकणातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












