भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना मिळालेली संधी सिंधुदुवासीयांसाठी अभिमानाची व कोकणच्या सन्मानाची.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

सिंधुदुर्गनगरी l  प्रतिनिधी :         माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हे जिल्हावासियांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. संपूर्ण कोकणाचा हा सन्मान आहे. त्यामुळेच मंगळवारी जिल्ह्याभरात भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे. दरम्यान चव्हाण यांना असलेल्या संघटन कौशल्याच्या जोरावर भाजप शतप्रतिशत ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा १ जुलै रोजी होणार आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी आज ओरोस येते पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, जिल्ह्याचे सुपुत्र असलेले रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीची अधिकृत घोषणा मंगळवारी वरळी येथे होणार आहे. या सोहळा पाहण्यासाठी बरेच जन कार्यक्रमस्थळी रवाना झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष निवडी बाबत भाजपच्या काही निवडणूक प्रक्रिया असतात. रविवारी मतदान यादी प्रसिद्ध झाली. राज्य परिषद सदस्य मतदान करतात. आज दुपारी एक ते चार पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मंत्री चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, खा नारायण राणे , पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत फॉर्म दाखल केला जाणार आहे. आणि उद्या मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार आहे. हा सन्मान जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. चव्हाणा यांच्या निवडीनंतर जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करणार आहे.

प्रभाकर सावंत पुढे म्हणाले, राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्राला अद्याप मिळालेले नव्हते, ती उणीव रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने भरून निघणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मंगळवारी तालुकास्तरावर केले जाणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी यांच्या नियोजनासाठी व्हीसी नियोजित केली आहे. प्रदेशाध्यक्ष निवडी नंतर रवींद्र चव्हाण जिल्ह्यात आल्यावर त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. महाराष्ट्रात भाजपचे दीड कोटी सदस्य आहेत. तसेच केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. अशा एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण होत असल्याने त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परिणामी पूर्ण जिल्हाभर आनंदोत्सव आहे, असेही यावेळी सावंत यांनी सांगितले.

 

 

Box.. राजकारणातला २५ वर्षाचा अनुभव

रवींद्र चव्हाण यांना राजकारणातला पंचवीस वर्षाचा अनुभव आहे. राजकीय प्रवास पाहता त्यांनी युवा मोर्चा उपाध्यक्ष या पदावर सुरुवातीला काम केले. त्यानंतर नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अशी विविध पदे भूषवून राज्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी असताना त्यांनी कोकणातील ७ लोकसभा आणि ३९ विधानसभा मध्ये विशेष लक्ष दिल्याने ६ विधानसभा महायुती जिंकली आणि ३५ जागांवर आमदार निवडून आले.

 

Box.. संघटन कौशल्यात मोठा वाटा

राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांना एखादे मंत्रीपद मिळेल असे वाटत होते परंतु चव्हाण यांचा संघटन कौशल्यात मोठा वाटा असल्याने व संघटन कुशल व्यक्तिमत्व असल्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळत आहे. संघटना सांगेल तसा वागण्याचा त्यांचा स्वभाव आहे.त्यांच्या संघटन कौशल्याच्या जोरावर भाजप शतप्रतिशत ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली.

 

Box.. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका

राज्यात नेत्यांच्या निवडणुका झाल्याने आता आगामी काळ हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकांचा असणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगराध्यक्ष यांच्यासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्यासारखे संघटन कौशल्य लाभलेले प्रदेशाध्यक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याने भाजपला निश्चितच शतप्रतिशत कडे नेतील असे विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.