आंबव पोंक्षे येथील कामावर सुरेश भायजे यांचा सवाल

गौरव पोंक्षे l माखजन : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तुरळ-माखजन-सरंद – आंबवपोक्षे ते आरवली या ९.२३ कि.मी. रस्त्यासाठी सात कोटी ४० लाख १५ हजार रुपये मंजूर करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष काम करताना मोठ्या प्रमाणावर निधीचा गैरवापर झाल्याने जनतेच्या गैरसोयी दूर झाल्या नसल्याने “भीक नको पण कुत्र आवर” अस म्हणण्याची वेळ जनतेवर आलेली आहे .या संपूर्ण कामाची प्रत्यक्ष पाहणी होऊन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल बहुजन विकास आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे यांनी केला आहे.
केवळ संरक्षण भिंत नसल्यामुळे आंबव पोंक्षे ते आरवली दरम्यान रस्ता पहिल्याच पावसात खचला आहे. अनेक ठिकाणी गटार काढले नसल्यामुळे रस्ता ची साईड पट्टी वाहून मोठ मोठ्या चरी पडल्या आहेत. त्यामुळे डांबरी करणावरून गाडी जरा बाहेर गेली तर पलटी झालीच समजा असा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.
घडशीवाडी स्मशानभूमी येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून एसटी बस वळवण्यासाठी ४० मीटर लांबी रुंदी चे डबल सोलिंग व खडीकरण करून रस्ता केला होता. त्याच ठिकाणी गेल्या वर्षी गरज नसताना संबंधित ठेकेदारने मोरी टाकली की त्या मोरीतून पाणी नाल्यात जाण्याऐवजी, नाल्याचेच पाणी मोरीतून गटारात येऊन वाडीतील लोकांच्या घरादारात शिरले होते. त्यामुळे ती मोरी काढून टाका अशी मागणी ग्रामपंचायत वतीने करण्यात आली होती .मात्र अद्यापही संबंधीत ठेकेदाराने ती मोरी काढलेली नाही.
सदर अंदाजपत्रकात सरंद जाधव वाडी येथे व आंबवपोंक्षे जुनी मराठी शाळा येथे असे दोन काजवे साठी लाखोंचा निधी मंजूर करण्यात करण्यात आला. पण त्या कॉजवे ऐवजी तेथे स्लॅब ड्रेन घ्या असे वारंवार ग्रामस्थांनी सांगूनही लेखी मागणी पत्र व्यवहार करूनही त्याकडे प्रशासनात दुर्लक्ष करून सरंद येथे पहिला कॉजवे तोडून पुन्हा पाईप टाकून नवीन कॉजवे बांधला त्यासाठी लाखोंचा निधी खर्च केला मात्र मोठ्या पावसात पाणी आले की कॉलेजच्या वरून जाऊन लोकांची गैरसोयच होते.
आंबव पोंक्षे मराठी शाळेजवळ मोठ्या पावसात कॉजवे वरून पाणी जाते म्हणून ते जाऊ नये या करिता या ठेकेदार व प्रशासन अधिकाऱ्याने त्या कॉजेव वर दीड फुटाची उंचीचा स्लॅब टाकला. पण पहिल्याच पावसात नाल्यातील कचरा पाईप मोऱ्यात अडकल्याने पाणी काजवे वरील शेतकऱ्यांचे शेतात घुसून शेतीची बांध बध्यस्थीची प्रचंड नासधूस झाली व काजवे शेजारील संरक्षण भिंत फोडून खालील भातशेतीही उध्वस्त करून टाकली. आता जरा देखील मोठा पाऊस पडला तरी सदर रस्त्यावरची वाहतूक बंद होऊन ग्रामस्थांचे प्रचंड गैरसोय होत आहे.दोन्हीही काजवे चे नाले अरुंद असल्यामुळे त्या ठिकाणी स्लॅब ड्रेन बांधला असता तर वाहतुकीच्या सर्व समस्या सुट्ल्या असत्या.
या ठेकेदाराने एका शेतकऱ्यांसाठी दीडशे ते दोनशे मीटरची संरक्षण भिंत घालून दिली मात्र आंबव पोंक्षे गावच्या ज्या सुरेश बाळू जुवळे या शेतकऱ्याने स्वतःच्या जमिनीतून सुमारे ३०० मीटर लांबीचा रस्ता दिला , घराच अंगण तोडून रस्ता दिला ,त्या शेतकऱ्याच्या घराशेजारी दहा,पंधरा मीटर लांबीची भिंत घालून दिली नाही.ही वस्तुस्थिती असल्याचे भायजे यांनी सांगितले.
आंबवपोंक्षे ग्रामपंचायत कार्यालय ते आरवली. या २/०००ते ४/८३० किमी. या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरुस्ती, डोंगरी विकास, स्थानिक विकास व जिल्हा नियोजन मधून सुमारे ६० लाख रुपये खर्चाचे आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नाने डांबरीकरण मंजूर झाले ते काम ठेकेदार प्रथमेश निकम याने ३१ मे २०२३ ला पूर्ण केले होते. पावसाळा गेल्यानंतर त्याच रस्त्यावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून २०० मीटर डोंगराचा भाग वगळता अडीच किलोमीटर रस्त्यावर बीबीएम व कार्पेट करून संबंधित ठेकेदार ने रस्ता पूर्ण झाल्याचे जाहीर केले. मात्र अंदाजपत्रकात असणारे खडीचे तीनही थर त्याने टाकलेले नाहीत व डांबरीकरणाचा सिरकोट हा देखील थर टाकला नाही. हा सरळ सरळ भ्रष्टाचार नव्हे काय? ज्या रस्त्यावरच पाच महिन्यापूर्वी साठ लाख रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले तो रस्ता पुन्हा डांबरीकरण करण्याची गरजच काय??? ही शासकीय निधीची पर्यायाने जनतेच्या विकास निधीची नासदुस नाही का ??? यास जबाबदार कोण? त्याच्यावर कारवाई होणार का??? असे अनेकविध प्रश्न या अनुषंगाने उभे ठाकले आहे.झालेल्या डांबरीकरणावर पुन्हा डांबरीकरण करण्याऐवजी आवश्यक त्या ठिकाणी स्लॅप ड्रेन ,संरक्षण भिंत, वळण रुंदीकरण अशी काम घेता आली असती. की ज्यामुळे निधीचा योग्य उपयोग झाला असता व लोकांची गैरसोयही दूर झाली असती.
या रस्त्याच्या सुरुवातीलाआरवली येथे जे एस टी बस वाहतुकीसाठी अरुंद वळणे आहेत ती वळणे देखील रुंद करण्यात आलेली नाहीत. यावर्षी या वळणात दहाचाकी एक दोन ट्रॅक वाहने देखील अडकली होती. एस टी महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने तर या वळणातून आमची एसटी बस जाणारच नाही असे सांगितले आहे .मग जर एसटी वाहतुकीसाठी रस्ता योग्य नसेल तर रस्त्यावर करोडो रुपये खर्च होऊन त्याचा उपयोगच काय? रस्ते विकासासाठी आलेल्या निधीचा गैरवापर करणाऱ्या या अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई होणार का असं जनतेमध्ये प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान ३० जून रोजी रत्नागिरी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती(दिशा) सभेमध्ये आंबव पोंक्षे चे सरपंच व या समितीचे सदस्य शेखर उकार्डे याच रस्त्याच्या कामासंदर्भात अनेक अडचणी व तक्रारी चा पाढा वाचला.याची तात्काळ दखल घेत या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.











