राजापूर, l प्रतिनिधी तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील राजेंद्र पावसकर यांच्या मालकीच्या इमारतीला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमध्ये झालेल्या नुकसानीचे महसूल प्रशासनाकडून निवासी नायब तहसिलदार श्री. सरफरे, तलाठी संदीप कोकरे यांनी तात्काळ पंचनामे केले आहेत. त्यामध्ये या आगीमध्ये इमारतीच्या बांधकामाचे 8 लाख 50 हजार तर, व्यवसायिकांचे 18 लाख 9 हजार असे मिळून 26 लाख 59 हजार 455 रूपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तशी माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.
तालुक्यातील नाटे बाजारपेठेमध्ये धाऊलवल्ली येथील राजेंद्र पावसकर यांच्या मालकीची इमारत असून या इमारतीमध्ये व्यवसायिकांची विविध प्रकारची सात दुकाने आहेत. या इमारतीला दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी आग लागल्याची घटना घडली. काही मिनिटांमध्ये आगीचा मोठा भडका उडताना आगीच्या मोठमोठ्या ज्वाला निर्माण झाल्या. त्या ठिकाणी गोळा झालेल्या ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याला यशही आले. मात्र, त्यापूर्वी आगीमध्ये इमारतीमधील दुकाने आणि त्यामधील साहित्य जळून खाक झाली. दरम्यान, या घटनेमध्ये झालेल्या नुकसानीचे महसूल प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करण्यात आले. निवासी नायब तहसिलदार श्री. सरफरे, संदीप कोकरे आणि सहकार्यांनी हे पंचनामे केले. त्यामध्ये श्री. पावसकर यांच्या इमारतीच्या बांधकामाचे 8 लाख 50 हजार रूपयांचे तर, प्रसाद पाखरे यांच्या फोटो स्टुडीओ, केदार ठाकूर यांच्या कापड व प्लास्टीक दुकान, विनोद शेलार यांच्या चायनिज सेंटर, प्रदीप मयेकर यांच्या टेलरींग दुकान, निकीता गोसावी यांच्या ब्युटी पार्लर, नारायण गोसावी, दिगंबर गिजम यांच्या हॉटेल या सर्व व्यवसायिकांचे 18 लाख 9 हजार 455 रूपये असे मिळून एकूण 26 लाख 59 हजार 455 रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, इमारतीला लागलेल्या आगीमध्ये नुकसान झालेल्या या नुकसानग्रस्तांना आता शासनाकडून नुकसानभरपाईची प्रतिक्षा राहीली आहे.











