महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवणार 

सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक 

सावंतवाडी । प्रतिनिधी : आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधी जनजागृती मोहीम राबवण्याचे आश्वासन दिले. यासाठी लवकरच प्राचार्य आणि प्राध्यापकांची बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खंदारकर उपस्थित होते. तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, ॲड. नकुल पार्सेकर, अभिमन्यू लोंढे, हिदायतुल्ला खान, ऑगोस्तीन फर्नांडिस यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत आगामी आषाढी एकादशी आणि मोहरम सणांच्या शांततामय वातावरणात आयोजनावर चर्चा झाली. सावंतवाडी हे शांतताप्रिय शहर असल्याने, या दिवशी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी अधोरेखित केले.