दापोली :तालुक्यातील असोंड येथील रोहिदास वाडीमध्ये दारूच्या नशेत महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
29 जूनच्या रात्री, आपल्या मुलीसह वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असलेल्या स्नेहल सुधीर मुरुडकर या महिलेस मंगेश बाळाराम मुरुडकर (रा. रोहिदास वाडी, असोंड) याने अडवून शिवीगाळ केली आणि मारहाण केली.
दारूच्या नशेत असलेला मंगेश मुरुडकर याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या बांबूच्या काठीनं स्नेहल मुरुडकर यांच्या डाव्या बाजूच्या कमरेवर मारहाण केली. यात त्यांना मुका मार बसला. त्यानंतर त्याने स्नेहल मुरुडकर यांना ढकलून दिले व त्यांच्या उजव्या हाताला इजा केली. यावेळी सुधीर मुरुडकर, जे स्नेहल यांचे पती आहेत, त्यांनाही हाताने मारहाण करण्यात आली.
या संपूर्ण प्रकारानंतर स्नेहल मुरुडकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, 30 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता मंगेश मुरुडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपीविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.









