वैभववाडी | सडुरेत सिलेंडरचा भडका : तिघेजण जखमी

वैभववाडी प्रतिनिधी
घरात गॅस सिलेंडर भडका उडाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सडूरे गावठाण येथे रविवारी रात्री ८:३० वा. ही घटना घडली. या घटनेत आत्माराम बाळकृष्ण राणे वय ७०, प्रतिभा आत्माराम  राणे ६५, दिनेश आत्माराम राणे ३५ हे जखमी झाले आहेत. जखमींवर गोवा बांबूळी येथे उपचार सुरु आहेत.

रविवारी रात्री जखमी प्रतिभा राणे या जेवण बनविण्यासाठी किचन मध्ये गेल्या होत्या . यावेळी गॅस सिलेंडरला गळती लागलेली असल्याने त्यांनी गॅस पेटविताच गॅस चा अचानक भडका उडाला. आगीचा लोळ अंगावर असल्याने प्रतिभा राणे व बाजूला असलेले आत्माराम राणे तसेच मुलगा दिनेश यांना दुखापत झाली. या भडक्यात आत्माराम राणे व प्रतिभा राणे यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली. तर दिनेश यांच्या हाताला जखमा झाल्या.

तिघांनीही प्रसंगावधान राखल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. अचानक घडलेल्या या घटनेने राणे कुटुंबियांसह त्याचे शेजारी भयभीत झाले. घटनेनंतर घरातील विज प्रवाह बंद करण्यात आला. तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. याच वेळी वाभवे वैभववाडी नारपंचायतीच्या अग्निशमन बंब ला पाचारण करण्यात आले. काही वेळातच बंब घटनास्थळी दाखल झाला.

घटनेनंतर जखमींना स्थानिक रहिवाशांच्या मदतीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचाराकरिता त्यांना गोवा बांबूळी येथे दाखल करण्यात आले आहे