सावंतवाडी : शहरात मोहरमनिमित्त विविध ठिकाणी ताजे (ताजिया) बसविण्यात आले असून, एकूण सात ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जाणारा हा उत्सव सावंतवाडीच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. यंदाही सालाबादप्रमाणे पीर उत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.
शहरात सरदार निंबाळकर पीर, जलाल शहा पीर, तहसीलदार पीर, सय्यद पीर, म्हाताचे पीर, पटवीचे पीर, आणि काझीचे पीर असे एकूण सात ताजे बसविण्यात आले आहेत. या उत्सवात हिंदू बांधवांना विशेष मान असतो, तर सावंतवाडी संस्थांच्या राजघराण्याला नैवेद्याचा मान दिला जातो.
मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन यांनी करबला येथे दिलेल्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ मुस्लिम बांधव ताबूत विसर्जनाच्या दिवशी शोक व्यक्त करतात आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करतात. विशेषतः, सालईवाडा येथील सरदार निंबाळकर पीर हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सर्वात मोठे प्रतीक मानला जातो. सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेला हा ‘मराठ्यांचा पीर’ आजही सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. मुस्लिम बांधवांसह हिंदू धर्मीयही या पीराची पूजा करतात आणि येथे गूळ, धूप, अगरबत्तीचा नैवेद्य दाखविला जातो.
या पीराच्या विसर्जनावेळी एक अनोखी परंपरा जपली जाते. सरदार निंबाळकर पीर विसर्जनाला निघण्यापूर्वी कळसुलकर हायस्कूल येथील भवानी देवीच्या भेटीला जातो. पूर्वी पीराच्या पतवा भवानी मंदिरात ठेवल्या जात असल्याने ही प्रथा आजही सुरू आहे. एका आख्यायिकेनुसार, पूर्वी पीर म्हणून पूजले जाणारे पंजे विहिरीत सापडले होते, परंतु मधल्या काळात ते चोरीस गेले. त्यावेळी तत्कालीन सावंतवाडी संस्थानच्या राजांनी स्वखर्चाने ते पुन्हा तयार करून दिले, ज्यामुळे संस्थानचे या पीराशी असलेले नाते अधिक दृढ झाले. अशा प्रकारे, सावंतवाडी शहरात एकतेचा हा प्राचीन वारसा आजही मोठ्या अभिमानाने जपला जात आहे.













