विज्ञान मंडळाचा अभिनव उपक्रम
विक्रमी नोंदणीसह जिल्हा अग्रेसर
सिंधुदुर्ग: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती होत असताना, शालेय शिक्षणातही या तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज बनला आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ आणि समता फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “जनरेटिव्ह ए.आय.फॉर एज्युकेशन” म्हणजेच शिक्षणात AI चा वापर या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
आज (२ जुलै २०२५) संध्याकाळी ७.३० वाजता या चार दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षणाची सुरुवात होणार आहे, जे ५ जुलै २०२५ पर्यंत चालेल. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष दिनेश पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी, माध्य., जिल्हा परिषद, पुणे), डॉ. गणपत मोरे (शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग), दत्ता आरोटे (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ), रोहिदास एकाड (सचिव, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ) तसेच मार्गदर्शक सुनील वानखडे (ॲडव्हान्स कम्प्युटर ट्रेनर), मयूर आहेर आणि अमोल कळंबे (उपप्राचार्य, के.एम.ए.एस.टी.आय., रिसोड) उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षणात Chat GPT, Slidego AI, Question well, Flexi AI, Wolfram Alpha, Magic school अशा अनेक एआय साधनांचा शिक्षणात कसा उपयोग करायचा, याचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे ऑनलाइन प्रशिक्षण राज्यभरातील शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणारे ठरेल, अशी अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, या प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विक्रमी नोंदणी झाली असून, जिल्हा एआय साक्षरतेत अग्रेसर ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी केले आहे.
शिक्षणाधिकारी (माध्य.) कविता शिंपी यांनी शिक्षकांना अध्यापनात एआयचा वापर करून अद्ययावत होण्याचे आवाहन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केलेल्या या जिल्ह्याने एआय साक्षरतेतही आपले नेतृत्व सिद्ध करावे, यासाठी सुरू असलेल्या विज्ञान मंडळाच्या या उपक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. शिक्षणाधिकारी कविता शिंपी, डाएट प्राचार्य राजेंद्र कांबळे, तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.












