वीज कोसळण्याचे अलर्ट देणारे अ‍ॅप

मुंबई : वीज कोसळून दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यावर उपाय म्हणून वीज कोसळणार असल्याची किमान ४५ मिनिटे आधी अलर्ट देऊ शकणारी यंत्रणा आहे का ? असा प्रश्न भाजपा आमदार समीर कुनावार यांनी उपस्थित केला. याला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. राज्यात वीज कोसळणार असल्याचे अलर्ट देणारी दोन अ‍ॅप कार्यरत आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. या अॅपचा वापर वाढवून वीज कोसळून होणाऱ्या दुर्दैवी घटना टाळण्यास मदत होऊ शकते.

राज्यात २०२४ मध्ये वीज पडून १८१ जणांचा मृत्यू झाल्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले. ते भाजपा आमदार समीर कुनावार यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते.

अपघात विम्याबाबत शिउबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नालाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर दिले. वीज कोसळून मृत्यू झाला तर मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नियमानुसार चार लाख रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे. गंभीर जखमी झालेल्याला अडीच लाख रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे. गायीचा मृत्यू झाला तर गायीच्या मालकाला ३७ हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद आहे. शेळीचा मृत्यू झाला तर शेळीच्या मालकाला चार हजार रुपये मदत देण्याची तरतूद आहे. कोंबडीचा मृत्यू झाला तर कोंबडीच्या मालकाला १०० रुपये मदत देण्याची तरतूद आहे.