पुच्छ कालवा प्रवाहित
नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा
कार्यकारी अभियंता यांचा इशारा
दोडामार्ग l सुहास देसाई : तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला असून तालुक्यात सध्या मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे तिलारी धरणातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास धरणाच्या चारही दरवाजातून विसर्ग सुरू झाला असून नदी काठच्या गावांना पाणी पात्रात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असल्याचे तिलारी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी प्रहारशी बोलताना सांगितले आहे
तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची जोरदार सरी कोसळली आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील मुख्य व मोठे असलेल्या तिलारी धरणातील पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या सभोवताली असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा होते. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार अती वृष्टीमुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे हे धरण बुधवारपर्यंत भरून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती व तसा इशाराही नदीकाठच्या गावांना दिला होता.
मंगळवारी सकाळी ७:४५ वा.च्या सुमारास धरणाची पाणी पातळी १०५.०८ मीटर झाली होती. बुधवारी सकाळी ७:४५ वा.च्या सुमारास १०६.१० मीटर झाली, तर धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर झाल्यास पाण्याचा विसर्ग सुरू होतो. दुपारी २:५० वा.च्या सुमारास या पातळीत वाढ होऊन सांडवा माथा पातळी ओलांडली व धरणाच्या चारही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. बाहेर पडलेले हे पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळते. शिवाय तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्यातून विसर्ग होणारे पाणी देखील तिलारी नदीपात्रात येऊन मिळत असल्याने तिलारी नदी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे श्री बुचडे यांनीही केले आहे.












