पित्याने मुलीचे चप्पल, ओढणी ओळखली
रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरीतील रत्नादुर्ग किल्ल्यावरील पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या तरुणीचे वडिल प्रकाशसिंह धारिवाल यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान,पोलिसांनी त्यांना त्याठिकाणी मिळून आलेले चप्पल आणि ओढणी दाखवल्यानंतर ते आपली मुलगी सुखप्रितचेच असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपल्या मुलीने भावनिक फसवणूक किंवा मानसिक छळातून तिने टोकाचे पाउल उचलले असावे असा संशय तरुणीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.
त्या तरुणीचे नाव सुखप्रीत धारिवाल असून तिचा शोध घेत असतानाच तिच्या आत्महत्येमागील कारणांचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती देताना तिला आत्महत्या करायचीच असती, तर ती नाशिकमध्ये केली असती. रत्नागिरीला का आली असती असा प्रश्न उपस्थित केला. सुखप्रीत ही नाशिकमधील आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होती. काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीत येण्यासाठी नाशिकहून प्रस्थान केलं होतं. तरुणीच्या बॅगेतून एक चिठ्ठी मिळाली असून, त्यामध्ये तिने
मी संकटात अडकले आहे. मी कोणाला सांगू शकत नाही. मी काय करू? मला समजत नाही.
असे लिहिलेले असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्याना, सुखप्रितच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूमागे एका विशिष्ट तरुणाचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे. तोच तिला सतत फोन करत होता, असा संतप्त आरोप त्यांनी केला.
त्यांनी नाव घेऊन रत्नागिरीत आयडीबीआय बँकेत कार्यरत असलेल्या या तरुणावर संशय व्यक्त केला आहे. त्याच्यामुळेच माझी मुलगी रत्नागिरीला आली होती. त्याने प्रेमाचं नाटक केलं, तिच्या भावना दुखावल्या आणि अखेर तिचा घात केला, अशा शब्दात त्यांनी आक्रोश व्यक्त केला.
सुखप्रीत ही काही काळापूर्वी बेंगळुरू येथील मणिपाल कॉलेजमध्ये बँक प्रशिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिची या तरुणाशी ओळख झाली होती. तिच्या मैत्रिणीच्या सांगण्यानुसार, या ओळखीनंतर सुखप्रीत दोन वेळा रत्नागिरीला येऊन त्याला भेटली होती. दरम्यान, पोलिसांनी त्या तरुणाला सुखप्रितच्या वडिलांसमक्ष चौकशीसाठी बोलावले होते.
चौकट – पोलिस तपास सुरुच
सुखप्रित धारिवाला या तरुणीचा रविवार पासून समुद्रकिनार्यांवर शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणातील अनेक बाबी अजूनही अंधारात आहेत.
पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, सुखप्रीतच्या कॉल रेकॉर्ड, तिच्या संपर्कातील व्यक्ती, आणि मृत्यूच्या आधीचे हालचाली यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.













