शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांसाठी गणवेश (ड्रेस कोड) बंधनकारक असतानाही अनेक कर्मचारी त्याचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढे कर्मचारी गणवेशात न दिसल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी आज सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांना दिला.
शुक्रवारी संजू परब यांनी सावंतवाडी एसटी आगाराला भेट दिली. यावेळी त्यांनी आगार प्रमुखांसोबत विविध समस्यांवर चर्चा केली आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींकडे त्यांचे लक्ष वेधले. याच भेटीदरम्यान त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या गणवेश नियमांच्या पालनाबाबत श्री. गावित यांना जाब विचारला. “कर्मचारी गणवेशात का नसतात? महामंडळाचे नियम असतानाही त्याची अंमलबजावणी का होत नाही?” असे प्रश्न परब यांनी उपस्थित केले.
यावर, आगार व्यवस्थापक श्री. गावित यांनी कर्मचाऱ्यांना लवकरच योग्य ती समज दिली जाईल आणि गणवेश नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनानंतरही संजू परब यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. परब म्हणाले, “आम्ही पाहतोय की, अनेकदा कर्मचारी गणवेशाशिवायच ड्युटीवर असतात. यामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होते आणि शिस्तीचा अभाव दिसतो.”
यापुढेही जर कोणत्याही कर्मचाऱ्याने गणवेश नियमाचे उल्लंघन केले आणि तो गणवेशाशिवाय दिसला, तर शिवसेना आपल्या पद्धतीने, म्हणजेच जनआंदोलनाच्या माध्यमातून किंवा अन्य योग्य त्या मार्गाने, त्याच्यावर ‘बंदोबस्त’ करेल, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.
त्यांच्या या भूमिकेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये धांदल उडाली असून, गणवेश नियमांची कठोरपणे अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.










