स्पर्धा परीक्षांसाठी एआयचा वापर करा: जिल्हाधिकारी अनिल पाटील 

पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात बापूसाहेब महाराजांच्या कार्याला उजाळा

सावंतवाडी । प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमादरम्यान, जिल्हाधिकारी पाटील यांनी पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराजांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, बापूसाहेब महाराजांचे काम अत्यंत चांगले होते. त्यांनी त्या काळात आरोग्य, शिक्षण आणि रस्ते यांसारख्या मूलभूत प्रश्नांना महत्त्व दिले होते, ज्यामुळे त्यांची दूरदृष्टी स्पष्ट होते. बापूसाहेब महाराज हे लोककल्याणकारी राजा होते आणि त्यांनी ब्रिटिशांच्या काळातही आपल्या राज्यातील जनतेसाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महात्मा गांधीजींनी त्यांना ‘राम राजे’ असे संबोधले होते, असेही पाटील यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पाटील यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले दहावी-बारावीपर्यंत उत्तम कामगिरी करतात, मात्र त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठीही तयारी केली पाहिजे. ते म्हणाले की, यशस्वी होण्यासाठी किती अभ्यास करता यापेक्षा कसा अभ्यास करता आणि अभ्यासातील बारकावे कसे टिपता याला महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करून प्रशासकीय सेवेत असलेल्या अनेक संधींचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन जिल्हा प्रशासनाकडून नेहमीच मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सावंतवाडी संस्थानाचे राजे खेमसावंत भोसले, राणी शुभदादेवी सावंत भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले, संस्थानाचे राजगुरू राजेंद्र भारती महाराज, प्रांताधिकारी हेमंत निकाम, तहसीलदार श्रीधर पाटील, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप भारमल, जयप्रकाश सावंत, सतीश सावंत, दिलीप देसाई, शामराव सावंत आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावंतवाडी संस्थानाचे राजे खेमसावंत भोसले यांनी यावेळी बापूसाहेब महाराजांच्या कार्याची दखल घेऊन ते म्हणाले की, ब्रिटिश काळात बापूसाहेब महाराजांच्या माध्यमातून अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. मात्र, अन्य देशांच्या तुलनेत आपले संस्थान लहान असल्यामुळे त्यांच्या कार्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. येणाऱ्या पिढीने हे काम हाती घेतले पाहिजे आणि बापूसाहेब महाराजांचे कार्य देशभर पोहोचले पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी यावेळी बापूसाहेब महाराजांच्या अनेक आठवणीही सांगितल्या.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.