सावंतवाडी: शहरातील व्यापारी, विठ्ठलभक्त आणि माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक प्रसन्न उर्फ नंदू चंद्रकांत शिरोडकर (वय ६०) यांचे शुक्रवारी दुपारी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सावंतवाडी शहरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरोडकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आयोजित पालखी सोहळ्यात ते उत्साहाने सहभागी झाले होते. आरती आणि महाप्रसादानंतर त्यांना दुपारी अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते घरी परतले. घरी असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रसन्न शिरोडकर हे प्रतिपंढरी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सदस्य होते. शहरात त्यांचे किराणा मालाचे दुकान असून ते एक प्रसिद्ध व्यापारी होते. आमदार दीपक केसरकर यांचे ते अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ आणि भावजय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सावंतवाडी शहराने एक निष्ठावान कार्यकर्ता, सेवाभावी व्यक्ती आणि लोकप्रिय व्यापारी गमावला आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.












