देवगड (प्रतिनिधी)
देवगड एसटी आगारातून सायंकाळी ४.१५ वाजता निघणारी देवगड-तांबळडेग बस फलाटावर येत असताना बसमध्ये चढण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांनी मोठी झुंबड केली. या गोंधळात १७ वर्षीय कॉलेज तरुणीच्या पायाला गाडीचा पत्रा लागून ती जखमी झाली.
सदर तरुणीचे नाव संजीवनी नारायण घाडी (वय १७, रा. दहिबाव घाडीवाडी) असे आहे. ती देवगड येथील न.शा. पंत वालावलकर महाविद्यालयात इयत्ता बारावी (सायन्स) शिक्षण घेत आहे. कॉलेज सुटल्यानंतर सायंकाळी ती नेहमीप्रमाणे एसटीने गावी जाण्यासाठी स्टँडवर आली होती.
बस क्रमांक एमएच २० डी ११७५ ही चालक लवू सावंत व वाहक जे. एस. कदम हे फलाटावर लावत असताना विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली. या गर्दीत झालेल्या धक्काबुक्कीत संजीवनी घाडी खाली पडली व तिच्या उजव्या पायाला गाडीचा पत्रा लागून जखम झाली.
यावेळी देवगड युथ फोरमचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने तिला देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. घटनेची माहिती मिळताच एसटी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, देवगड कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शरद शेटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, तसेच आशिष कदम व प्रवीण सावंत यांनीही रुग्णालयात धाव घेतली.
एसटी प्रशासनाच्या वतीने उपचारासाठी तिला एक हजार रुपयांची मदत देण्यात आली असून आणखी मदत पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
या घटनेमुळे काही काळ देवगड आगारातील गाड्यांची वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र नंतर बस सेवा सुरळीत सुरू करण्यात आली.
दरम्यान, देवगड एसटी स्टँडवर सायंकाळच्या वेळी कॉलेज सुटल्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अशा घटना यापूर्वीही घडल्याचे सांगण्यात येत आहे.











