रत्नागिरीत आषाढीवारीतून विठ्ठलाचा गजर

रत्नागिरी, ता. ६ : रत्नागिरी शहरात सलग चौथ्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त आषाढीवारीला उदंड प्रतिसाद लाभला. विठ्ठल नामाचा गजर करत दोन ठिकाणी रिंगण करण्यात आले. पारंपरिक वारकरी वेशभूषेत तसेच संतमंडळी अवतरली. टाळ-मृदंगाचा गजर आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे चार हजारांहून अधिक वारकऱ्यांनी या आषाढीवारीत आनंदाने, उत्साहाने भाग घेतला.

शक्ती मंदिर अर्थात मारुती मंदिर ते भक्तीमंदिर म्हणजे विठ्ठल मंदिर या अडीच किलोमीटरच्या मार्गावर शिस्तबद्ध रितीने वारी झाली. मारुती मंदिर येथून सकाळी वारी सुरू झाली. ही वारी माळनाका, जयस्तंभ, एसटी स्टॅंडमार्गे, राम आळीतून बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात पोहोचली. पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदंगांचा गजर करत आणि डोईवर तुळशी वृंदावन घेऊन महिला वारकरी सहभागी होणार झाल्या.

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत विठु माऊली आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंढरीची वारी. आषाढी एकादशी आली की वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते. वारीला जवळपास ८०० वर्षांची परंपरा आहे. आयुष्यात एकदा तरी वारी घडावी अशी माणसाची मनोमन इच्छा असते. ही इच्छा सकल हिंदू समाजाने आषाढीवारी आयोजित करून पूर्ण केली.

विठुरायाची भजने, अभंग, गजर यातून वातावरण भक्तीमय झाले. यासह मराठी बोला, लिहा, वाचा, मराठी माझी मातृभाषा, मी मराठी महाराष्ट्राचा याचाही गजर करण्यात आला. वारीत पुढे वारकरी दल, त्यामागे तुळशी वृंदावन व पताका घेतलेले दल होते. तसेच अनेक भाविकांनी टाळ घेऊन आले होते. वारी मार्गात रिंगणाच्या ठिकाणी सर्वात बाहेरच्या फेरात पुरुष, मधल्या फेरात माता- भगिनी व सर्वात आत टाळकरी- वारकरी होते. वारी मार्गाने चालताना सर्वांनी शिस्तीचे पालन केले.

माळनाका आणि जयस्तंभ येथे वारकऱ्यांनी रिंगण केले. मातृभाषा मराठीचा अभिमान, पाकिस्तानविरुद्ध उद्भवलेली युद्धसदृश परिस्थिती यावरही सहभागी वारकऱ्यांनी अभंग, गाणी सादर केली. तसेच पोस्टर्सही झळकली होती.