‘व्यसनमुक्तीची वारी… विठ्ठलाच्या दारी’ – विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी
साळशी केंद्र शाळेत व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम 
शिरगाव (प्रतिनिधी) – व्यसन ही समाजाला लागलेली कीड असून, त्यापासून दूर राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सण-उत्सवांच्या निमित्ताने दारूच्या पार्टीचे वाढते प्रमाण समाजासाठी अत्यंत घातक आहे. व्यसनापासून दूर राहा आणि पुढील पिढी वाचवा,” असे प्रतिपादन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक सौ. अर्पिता मुंबरकर यांनी साळशी येथे केले.
समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, नशाबंदी मंडळ (महाराष्ट्र राज्य, मुंबई शाखा), साळशी ग्रामपंचायत आणि पोलिस पाटील सौ. कामिनी नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत साळशी केंद्रशाळेत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी साळशी हायस्कूल ते केंद्रशाळा दरम्यान विद्यार्थ्यांनी “व्यसनमुक्तीची वारी… विठ्ठलाच्या दारी” या सारख्या जनजागृती फेरीत घोषणा देत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
यावेळी सरपंच सौ. वैशाली सुतार यानी मुलांवर बालवयातच योग्य संस्कार झाले, तर भावी पिढी व्यसनमुक्त राहू शकते.असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात ‘महामानवांचे व्यसनमुक्तीपर विचार’ ही पुस्तिका सौ. अर्पिता मुंबरकर यांनी केंद्रप्रमुख गंगाधर कदम यांना भेट दिली.तसेच यावेळी उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.
यावेळी सरपंच सौ. वैशाली सुतार, उपसरपंच पांडुरंग मिराशी, पोलिस पाटील सौ. कामिनी नाईक, माजी सरपंच वैभव साळसकर, सौ. विशाखा साळसकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख गंगाधर कदम, विजय सुतार, प्रभाकर साळसकर, विक्रांत नाईक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट सीआरपी, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. संजय मराठे यांनी केले.













