चिपळूण (प्रतिनिधी) : घरडा अभियांत्रिकी महाविदयालय लवेल येथील इलेक्ट्रानिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे विविध औद्योगिक संस्थासोबत विद्यार्थी प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार करण्यात आले. घरडा महाविदयालयाच्या परीसरामध्येच डॉ. घरडासरांच्या प्रेरणेने सुरु करण्यात आलेले होशगं पटेल टेक सेंटर हे सोलार तंत्रज्ञानमध्ये कार्यरत असलेले केंद्र असून येथे विविध प्रकारचे अद्यावत सोलर पॅनेल तसेच सौरउर्जेवर चालणारे लहान, मध्यम व मोठ्या आकाराचे बॅटरी संच बनविण्यात येतात.
सौरउर्जेवर चालणाऱ्या विविध वस्तू बनविण्यासाठी येथे स्वतंत्र विभाग आहे. याच विभागात घरडा महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक्स विभागातील विद्यार्थ्याना सत्रादरम्यान प्रशिक्षण दिले जाते. दुरऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना येथे कौशल्य आधारीत प्रशिक्षण दिले जाते तसेच छोट्या छोट्या इलेक्ट्रानिक्स प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्याना इलेक्ट्रानिक्स सर्किट डिझाईन आणि मॅन्युफॅचरींग पध्दती संदर्भात प्रशिक्षण दिले जाते.
तिसऱ्या आणि चौथ्या वर्षातील विद्यार्थी या प्रशिक्षणाच्या जोरावर आपले मेजर प्रोजेक्ट निवडतात. यामध्ये होशगं टेक सेंटर कडून मुलांना प्रोजेक्टसाठी लागणारे साहित्य पुरविले जाते. या सेंटरमार्फत प्रशिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्याना विविध कंपन्यामध्ये काम करण्याची संधी मिळते. सध्याच्या इलेक्ट्रानिक्स इंडस्ट्रीजमधील वाढती गरज पाहता विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याचा फायदा त्यांच्या भावी जीवनात नक्कीच होईल असे मत घरडा इलेक्ट्रानिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. सचिन खेडेकर यानी व्यक्त केले. या सामंजस्य करारासाठी प्राचार्य डा. प्रमोद पाटील व हुशागं टेक सेंटरचे कार्यकारी प्रमुख डा. रंगा यांचे मोलाचे सहाकार्य लाभले.









