काजूगर निर्मितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो ग्रामीण महिलांना आणि काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी व सन्मानजनक रोजगार मिळवून देणाऱ्या रत्नागिरी येथील दळवी कॅशुचे मालक श्री.संदेश परशुराम दळवी यांना महाराष्ट्र शासनाचा खादी ग्रामोद्योग भरारी पुरस्काराने* गौरवण्यात आले. मुंबईतील राजभवन येथे नुकत्याच पार पडलेल्या एका समारंभात राज्याचे राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची विशेष उपस्थिती होती.
सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्यपालांनी ग्रामीण महिलांना आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेल्या कार्याचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या हक्काचे पैसे कमवता यावेत व कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा, या उदात्त हेतूने त्यांनी संगमेश्वर तालुक्यातील घोडवली गावामध्ये काजूगर प्रक्रिया उद्योगाची २०१० साली मुहूर्तमेढ रोवली.त्यांना धर्मपत्नी सौ.श्रद्धा दळवी यांनी या व्यवसायामध्ये मोलाची साथ दिली. सुरुवातीला केवळ ०५ महिलांसह श्री.व सौ.श्रद्धा संदेश दळवी यांनी, छोट्या प्रमाणात काजू व्यवसाय चालू केला होता.सध्या त्यांनी ११५ महिलांना प्रत्यक्ष आणि सुमारे १२०० काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध केला आहे.
Home महत्वाच्या बातम्या काजूगर उत्पादक संदेश दळवी यांना राज्यपालांच्या हस्ते खादी ग्रामोद्योग उद्योग भरारी पुरस्कार.













