प्राथमिक तपासात दुसऱ्या देशाची बोट रायगड किनाऱ्यावर वाहून आल्याचा संशय
रायगड: रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट दिसल्यामुळे, परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या बोटीचा अलर्ट मिळाल्यानंतर रायगड पोलिस, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड (BDDS), क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), नौदल आणि तटरक्षक दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किनाऱ्याजवळ एक संशयास्पद बोट दिसल्याने किनारी भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेवदंडाच्या कोरलाई किनाऱ्यापासून सुमारे दोन नॉटिकल मैल अंतरावर सुरक्षा दलांना ही बोट दिसली.
सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या
बोटीची माहिती मिळताच, रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किनाऱ्यावर पोहोचले. तथापि, मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे त्यांना बोटीपर्यंत पोहोचण्यात मोठी अडचण आली.
जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली
दलाल स्वतः एका बार्जमधून बोटीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु खराब हवामानामुळे त्यांना परतावे लागले. खबरदारी म्हणून, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे आणि जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
१९९३ साली रायगड जिल्ह्यातील शेखाडी बंदरावर आरडीएक्स उतरवले गेले होते. ज्यामुळे मुंबई बॉम्बब्लास्टने हादरली होती. ती घटना लक्षात घेता, भविष्यात असा अनुचित प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल घालून संबंधित बोटिची तपासणी करत आहेत.












