प्यासा चित्रपट आणि मालवण याचा काय आहे संबंध… वाचा

९ जुलै २०२५ रोजी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर नाव असलेल्या गुरुदत्त यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. अभिनय, निर्मिती आणि विशेषतः दिग्दर्शन या सर्व क्षेत्रांत गुरुदत्त यांनी जी अमीट छाप सोडली आहे, ती आजही रसिकांच्या मनात कोरलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीचा पाया ज्या ठिकाणी रचला गेला, त्या ठिकाणाचे नाव आज फार थोड्यांना माहीत आहे — ते म्हणजे मालवण.

 

१९५० च्या दशकात संघर्ष करत असताना गुरुदत्त यांनी ‘बाझी’ या चित्रपटातून दिग्दर्शनात प्रवेश केला. हा चित्रपट यशस्वी ठरल्यावर त्यांनी १९५२ साली ‘जाल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्णपणे मालवणच्या किनारपट्टीवर झाले होते. लोकेशनच्या शोधात गुरुदत्त मालवण परिसरात भटकत होते, पण हवे तसे ठिकाण सापडत नव्हते. शेवटी दांडी किनाऱ्यावरील एक कौलारू घर त्यांच्या नजरेस भावले. याच घरात त्यांनी “ये रात ये चांदनी फिर कहा…” हे अजरामर गीत चित्रित केले.

 

हे घर आजही घराचे मालक आनंद हूले यांनी तसेच जपून ठेवले आहे. केवळ घरच नाही, तर या घरातील एक विशेष खोली आणि त्यामधील सागवानी पलंग देखील, ज्यावर अभिनेत्री गीताबाली काही काळ वास्तव्य करत होती, आजही आठवणींच्या रूपाने सुरक्षित ठेवले गेले आहे. जाल चित्रपटात गीताबाली हिने एका मच्छिमार मुलीची भूमिका केली होती. त्या भूमिकेत तिचा वावर अधिक वास्तवदर्शी व्हावा म्हणून तिच्या राहण्याची व्यवस्था दांडी किनाऱ्यावरील मच्छिमार वस्तीतील या घरात केली गेली होती.

 

गुरुदत्त हे केवळ दिग्दर्शक नव्हते, तर ते कलात्मक बारकाव्यांचे अत्यंत सजग निरीक्षक होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात सौंदर्य, संवेदना, प्रकाशयोजना, संगीत, संवाद आणि अभिनय यांचा अचूक संगम असायचा. प्यासा, कागज़ के फूल, साहिब बीबी और ग़ुलाम, चौदहवीं का चाँद हे त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध झाले.

 

त्यांच्या कामगिरीची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेली. टाइम मासिकाच्या शंभर सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत त्यांचा समावेश झाला. ‘साइट अँड साउंड’ या परीक्षकांच्या सर्वेक्षणात त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. २०१० मध्ये CNN च्या ‘२५ उत्कृष्ट आशियाई कलाकारांमध्ये’ त्यांचा समावेश झाला. तसेच जर्मनी, फ्रान्स आणि जपानमध्ये त्यांच्या चित्रपटांना विशेष सन्मान मिळाले.

 

गुरुदत्त यांचे वैयक्तिक जीवन मात्र कलात्मक यशाइतके सुखद नव्हते. त्यांनी प्रसिद्ध गायिका गीता रॉय-चौधरी यांच्याशी विवाह केला होता. गीतादत्त ही फक्त रूपगुणवती नव्हती, तर तीला स्वर्गीय आवाजाचे वरदान लाभले होते. तिच्या उडत्या चालींच्या गाण्यांना त्या काळात तरुणांमध्ये जबरदस्त लोकप्रियता होती.

 

लग्नानंतर काही वर्षांनी गुरुदत्त यांच्या आयुष्यात वहिदा रहमान या अभिनेत्रीचा प्रवेश झाला. गीतादत्तच्या मनात सतत संशय राहिला की गुरुदत्त आणि वहिदा यांच्यात प्रेमसंबंध आहेत. प्रत्यक्षात गुरुदत्तचे वहिदावर प्रेम हे केवळ तिच्या अभिनयावर होते. पण वैवाहिक तणावामुळे गीतादत्त त्यांचं सहजीवन सोडून निघून गेल्या.

 

यानंतर गुरुदत्तने स्वतःला दारूच्या आहारी नेले. ऑक्टोबर १९६४ मध्ये अवघ्या चाळीसव्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आठ वर्षांनी गीता दत्त यांचेही लिव्हर सिरोसिसमुळे निधन झाले.

 

गुरुदत्त यांच्या कारकिर्दीत मालवणचा जो सहभाग आहे, तो केवळ एक चित्रिकरण स्थळ म्हणून मर्यादित नाही. त्याच्या यशाच्या आणि कलात्मकतेच्या प्रवासात मालवणने जे योगदान दिले आहे, ते अजोड आहे. आजही दांडी किनाऱ्यावरचे ते घर, तेथे घेतलेले निर्णय, चित्रीकरणाचे आठवणी, गीताबालीचा वास्तव्याचा काळ — हे सगळे काही चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक जिवंत अध्याय म्हणून उभे आहेत.

 

गुरुदत्त यांचे यश कुठे सुरू झाले, याचा मागोवा घेतला तर त्यांच्या पावलांचे पहिले ठसे मालवणच्या वाळूत उमटले होते, हे विसरून चालणार नाही. “ये रात ये चांदनी…” हे गाणं केवळ एक प्रेमगीत नाही, तर मालवणच्या आठवणींचा एक संगीतबद्ध साक्षात्कार आहे. मालवण हे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर एक कलासंवेदनशील दिग्दर्शकाच्या स्वप्नांच्या सुरुवातीचं गाभारं आहे.