आदित्य ठाकरेंचा तो ‘पोरकटपणा’ : आ. दीपक केसरकर

आपण बोललो तर त्यांना पश्चात्ताप करण्याची येईल वेळ

आपली बांधीलकी केवळ जिल्ह्याशी व तत्त्वांशी

सावंतवाडी । प्रतिनिधी : “आदित्य ठाकरेंचा तो पोरकटपणा आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो,” अशा शब्दांत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून आदित्य ठाकरे हे महापालिकेच्या पैशांवर जगणारे लोक असल्याची टीका केली.
दरम्यान, मुंबईचा पालकमंत्री असताना आपण कंत्राटदारांकडून एक रुपयाही घेतल्याचे सिद्ध करण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, आपली बांधीलकी आपल्या जिल्ह्याशी आणि तत्त्वांशी आहे. त्यांच्या फालतू घोषणांना जागेवरच उत्तर देऊ शकलो असतो, पण त्यामुळे ठाकरे घराण्याचा कमीपणा झाला असता. मी स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही, पण कोणी अंगावर आले तर सोडत नाही. त्यामुळे विनाकारण भानगडीत पडू नका, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
शिक्षणमंत्री असताना केलेल्या कामांची माहिती देताना केसरकर म्हणाले की, यापूर्वी फक्त मागास विद्यार्थ्यांना गणवेश दिला जात होता, मात्र त्यांनी मंत्री असताना सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यास सुरुवात केली. तसेच, पुस्तकांचा बोजा कमी केला आणि मुलांना चांगल्या दर्जाचा गणवेश दिला. ही एक आदर्श योजना होती, असे सांगत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला “पोरकटपणा” असे संबोधले. उद्धव ठाकरे यांचा आजवर आदर केला मात्र जर आपण बोलायला सुरुवात केली तर त्यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिक्षण खात्यात आपण चांगले काम केले असून मराठीला न्याय दिला असल्याचे केसरकर यांनी ठामपणे सांगितले. राज ठाकरे नेहमी मराठीसाठी भांडतात आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवतात, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले.
याउलट, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांनी मुंबईतील मराठी शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा आरोप केला. त्यामुळे मराठीबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असे केसरकर म्हणाले. माझ्यासारखं काम शिक्षणक्षेत्रात कोणी केलं असेल तर दाखवा, मी राजकीय जीवनातून दूर होतो,” असे आव्हानही त्यांनी दिले.
लोकांचा गैरसमज आणि पायऱ्यांवर बसून केलेल्या गोष्टी आपण सहन करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागितली असून, त्यांनी मोकळीक दिल्यावर आपण बोलायला मोकळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी कोणाला घाबरत नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
खा. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा ठाकरे कुटुंबीयांच्या गाडीत सिंधुदुर्गात कोणी पेट्रोल भरत नव्हते किंवा राहायला जागा देत नव्हते, एवढा नारायण राणेंचा दरारा होता. त्यांना गोव्यात जावे लागत होते. त्यामुळे तेव्हा जिल्ह्यात ठाकरे आले नाहीत आणि आपण लढा दिला. राणेशी आपला वैयक्तिक वाद नव्हता काही कार्यकर्ते चुकीचे वागत होते. मात्र, ठाकरेंनी ‘युझ ॲड थ्रो’ केले, असा आरोपही केसरकर यांनी केला.