अंशतः अनुदानित शिक्षकांचा जुलै चा पगार वाढीव २०% नी
गौरव पोंक्षे l माखजन : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडाणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे.अधिवेशन १८ जुलै रोजी संपत आहे.दरम्यान वाढीव २०% साठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली जाईल व जुलै पेड इन ऑगस्ट हा पगार वाढीव पगाराने होईल असे स्पष्ट केले.
या बैठकीला मंत्री गिरीश महाजन,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.आ मंगेश चव्हाण,आ किशोर दराडे,आ.जयंत अभ्यंकर,आ अभिजित वंजारी,आ.जयंत आसगावकर,आ.सुधाकर अडबाले, आ.विक्रम काळे,मा.आ.श्रीकांत देशपांडे,मा.आ.दत्तात्रय सावंत आदींसह शिक्षक समन्वय संघाचे प्रा दीपक कुलकर्णी,प्रा निलेश गांगुर्डे,प्रा राहुल कांबळे,के.पी.पाटील,शिवराम म्हस्के,ज्ञानेश चव्हाण,आदींसह अन्य समन्वयक उपस्थित होते.
१० ऑक्टोबर २०२४च्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षकांना वाढीव २०% अनुदान देण्याचा लक्षवेधी निर्णय घेण्यात आला.व १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला.पुढे हिवाळी,अर्थसंकल्पीय व आत्ताचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले तरी आर्थिक तरतूद करण्यात आली नव्हती.
गत वर्षी च्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या घोषणेनुसार १ जून २०२४ पासून वाढीव २०% अनुदान द्या व १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाचे पूर्णपणे अनुपालन करा या एक मात्र मागणी साठी आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांचे आंदोलन सुरू होते.आंदोलनाची दखल पावसाळी अधिवेशनात न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षक समन्वय संघाने राज्यात ८ व ९ जुलै रोजी अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.व आझाद मैदानात मोठ्या संख्येने उतरण्याचा निर्धार करण्यात आला.आंदोलनात शेकड्यात असलेली संख्या ८ जुलै रोजी १५ हजारांच्या घरात गेली.शिक्षक व पदवीधर आमदारांकडून सातत्याने प्रश्नोत्तराच्या तासाला,लक्षवेधी च्या सत्रात यावर सतत आवाज उठवला जात होता पण याकडे सोयीस्कर रित्या थातूर मातूर उत्तरे देऊन विषय डावलला जात होता
९ जुलै रोजी आझाद मैदान शिक्षकांच्या संख्येने तुडुंब भरून गेले होते.या विराट आंदोलनाची दखल प्रथम आमदार रोहित पवार यांनी घेत ८ रोजी आंदोलनात सहभागी होत ‘शिक्षकांचा प्रश्न सुटणार नाही,तोपर्यंत आंदोलन उठणार नाही’ असा नारा देत मैदानात ठिय्या मांडला.रात्रभर आझाद मैदानावर रोहित पवार आंदोलन उपस्थित होते.८ रोजी स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार तर्फे उपस्थित राहत उद्या मुख्यमंत्री आंदोलकांसमवेत बैठक घेतील व तोडगा निघेल असे आश्वासित केले होते.
९ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,हे उपस्थित राहिले.थेट आझाद मैदानातून बोलताना शरद पवार यांनी,सरकारने एक दिवसात शिक्षकांचा प्रश्न सोडवावा असा इशारा दिला.शिवाय नंतर च्या काळात माजी विरोधी पक्ष नेते,विजय वडेट्टीवार,माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड,यांनी आझाद मैदानात हजेरी लावली.शरद पवारांसोबत आमदार निलेश लंके उपस्थित होते.
विधानपरिषदेत सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आझाद मैदानावर भेट दिल्यानंतर विषय लावून धरला,त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्पक उत्तर देत शिक्षकांसमवेत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे स्पष्ट केले
शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाची व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होऊन ,निर्णय होण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांची महत्वाची भूमिका राहिली.अखेर बैठकीतील निर्णय स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात येऊन सांगितला.
जुलै च्या वेतानातच वाढीव २०% अनुदान टाकण्याची शासनाची जबाबदारी राहील असे नमूद केले.शिवाय सर्व तांत्रिक बाबी अधिवेशन काळात पूर्ण केल्या जातील असे सांगितले.शिक्षकांचे पगार देखील ठराविक तारखेलाच होतील असे सांगितले.१४ ऑक्टोबर २०२४ चा शासन निर्णयानुसार आम्ही शिक्षकांना टप्पा वाढ देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान आझाद मैदानावरील आंदोलन हे निर्णयाची प्रत्यक्षात अमलबजावणी होईपर्यंत ठराविक संख्येत सुरूच राहणार असल्याचे शिक्षक समन्वय संघाकडून सांगण्यात आले आहे.










