शहरात वाढत्या चोऱ्यांविरोधात व्यापारी संघटना आक्रमक
दोडामार्ग : सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यात व शहरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्ग प्रचंड संतप्त झाला असून, या गंभीर प्रकारांविरोधात आता थेट पोलिस प्रशासनालाच जाब विचारण्यात आला आहे. दोडामार्ग व्यापारी संघटनेने पोलिस निरीक्षकांना निवेदन देत तात्काळ कठोर कारवाई, नियमित गस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची ठोस मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांत दुकानफोडी, घरफोड्या व माल चोरीच्या घटना वाढल्या असून, यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “असुरक्षिततेची भावना दूर न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा स्पष्ट इशाराच व्यापाऱ्यांनी दिला आहे.
निवेदनात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवणे, संशयितांवर कडक नजर ठेवणे, बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करणे, तसेच चोऱ्यांचा छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या काळात व्यापारी संघटना अधिक आक्रमक भूमिका घेईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर दोडामार्ग व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून, प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अन्यथा जनआक्रोश उफाळून येईल, असा इशारा परिसरातून दिला जात आहे. यावेळी व्यापारी सागर शिरसाट, संतोष नानचे, वैभव इनामदार, भूषण सावंत, सुदेश मळीक, राजेश सावंत, श्याम चांदेलकर, बंटी मोरजकर, अनिल सांबारी, ओंकार पेडणेकर, फोंडू हडीकर, बाळू गावडे, श्री.मयेकर आदी उपस्थित होते.











