गुहागर l प्रतिनिधी :गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथे गुरुवारी सकाळी आढळून आलेल्या १० फूटी महाकाय अजगराला सर्पमित्रांनी मूळ
नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.
पाटपन्हाळे गणेशवाडी येथील गणेश चव्हाण व दिनेश चव्हाण यांच्या घराशेजारी
एका कुंपणात महाकाय अजगर आढळून आला. त्याला पकडण्यासाठी सर्पमित्रांना
पाचारण करण्यात आले. शृंगारतळी येथील अरमान मुजावर व पप्या चव्हाण या
दोघांनी अजगराला पकडले. यावेळी रानवी वनरक्षक सिध्देश्वर गायकवाड, आबलोली
वनरक्षक कुमार पवार, पिंट्या गुरव, बाळू चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
सर्पमित्र अरमान मुजावर याने तालुक्यात आतापर्यंत विविध जातीचे सर्प
पकडून त्यांना जीवदान दिले आहे.
सध्या पावसाळ्यात सरपटणारे विषारी प्राणी मुक्त संचार करताना दिसून येत
आहेत. ग्रामीण भागात या प्राण्यांचे दर्शन घडून येत आहे. अशा प्राण्यांना
पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी सर्पमित्रांची गरज आहे मात्र,
गुहागर तालुक्यात सर्पमित्र नसल्याने वन विभागाने सर्पमित्राची नियुक्ती
करावी, अशी तालुक्यातून मागणी होत आहे.












