संगमेश्वर – ओझरे खुर्द येथील प्रहार या भागात काजू बी साठवलेल्या खोलीतील पत्र्याचे हुक काढून, सरकवून आणि दरवाज्याची कडी तोडून एकूण ७३ हजार रुपये किमतीच्या काजू बिया चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शैलेश शरदचंद्र जागू (वय ५५, व्यवसाय – शेती, काजू फॅक्टरी, रा. ओझरे खुर्द) यांनी याबाबत फिर्याद दिली असून, १९ जून २०२५ ते २३ जून २०२५ या कालावधीत त्यांच्या मालकीच्या काजू बी साठवणूक खोलीचे पत्रे काढून चोरट्याने बारा पोती काजू बिया चोरल्या. प्रत्येकी ५० किलो वजनाच्या या पोट्यांची एकूण किंमत अंदाजे ७३ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी विराज डाफळे (रा. सोनवणे, ता. संगमेश्वर) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून, देवरुख पोलीस ठाण्यात १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरुख पोलीस अधिक तपास करत आहेत.












