रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा बनावट पोलीस दाखल

चिपळुणात ८० वर्षीय वृद्धाची ९८ हजारांची चैन लंपास; आरोपींना पकडणार कधी? नागरिकांचा सवाल 

चिपळूण: ‘पोलीस असल्याची’ बतावणी करून दोन अज्ञात भामट्यांनी एका ८० वर्षीय वृद्धाला फसवून त्यांची ९८,००० रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची खळबळजनक घटना चिपळूणमध्ये घडली आहे. ही घटना १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३८ वाजता स्वागत हॉटेलसमोरील रस्त्यावर घडली.

फिर्यादी शांताराम दौलतराव साळवी (८०, रा. रॉयल नगर, मार्कंडी) हे चिपळूण एसटी डेपोच्या बाजूने जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांनी साळवी यांना अंगावरील सोन्याची चैन, हातातील घड्याळ आणि चावी काढून खिशातील रुमालात ठेवण्यास सांगितले. आरोपींनी फिर्यादीचा रुमाल हातात घेऊन त्यात सर्व दागिने ठेवल्याचा बहाणा केला आणि तो रुमाल साळवी यांना परत देऊन तेथून पळ काढला. आरोपी गेल्यानंतर साळवी यांनी रुमाल तपासून पाहिला असता, त्यात घड्याळ आणि चावी होती, मात्र सुमारे २ तोळे वजनाची सोन्याची चैन गायब होती.

या फसवणुकीप्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.