संत एकनाथ महाराजांच्या ‘श्री दत्त आरती’ ला मिळालं नवं रुप

द्रौपदी क्रिएशनच्या नव्या आरतीला रसिकांची पसंती

सावंतवाडी । प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत, संत एकनाथ महाराजांनी रचलेली ‘श्री दत्त आरती’ आता नव्या संगीत रूपात रसिकांच्या भेटीस आली आहे. ‘द्रौपदी क्रिएशन्स’ने सादर केलेले हे गीत गुरुवारी (१० जुलै) प्रदर्शित झाले असून, ‘देवदंग आरती’ संग्रहातील ही पहिलीच आरती आहे. सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत आणि गायिका केतकी सावंत यांच्या सुमधुर आवाजात गायलेली ही आरती सध्या सर्वच स्तरांतून कौतुकास पात्र ठरत आहे.

कोकणावर आधारित अनेक प्रसिद्ध गीते देणारे संगीतकार प्रणय शेट्ये यांची ही संकल्पना आहे. विशेष म्हणजे, अभिजीत सावंत यांच्यासोबत सिंधुदुर्गची कन्या असलेल्या गायिका केतकी सावंत यांनीही या आरतीला आपला आवाज दिला आहे. सोनल तानवडे यांनी याची निर्मिती केली असून, सार्थक कल्याणी यांनी संगीत संयोजन केले आहे. सार्थक कल्याणी, ओमकार सावंत, मुक्ती कोयंडे, सर्वेश राऊळ, अमेय नर यांनी या गीताला कोरसची साथ दिली आहे.

या आरतीचे रेकॉर्डिंग यशराज स्टुडिओमध्ये झाले असून, विजय दयाळ आणि सागर साठे यांनी रेकॉर्डींगचे काम पाहिले आहे. मिक्सिंग सार्थक कल्याणी यांनी केले असून, मास्टरींग विजय दयाळ यांनी केले आहे. आकाश शर्मा आणि निखिल पवार यांनी प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम पाहिले आहे. सोनल तानवडे यांनी कॅलिग्राफी केली असून, ॲसिडुअस पिक्चर स्टुडिओचे प्रितम येलकर आणि दुर्वा येलकर यांनी आर्टवर्क व मोशन पोस्टरची निर्मिती केली आहे. सुयोग हांदे आणि प्रणित निकम यांनी छायाचित्रण केले असून, संकलन प्रणित वणवे यांनी केले आहे.

या उपक्रमाला सैलेंद्र सुभाष राणे, संजय विरनोडकर, गंधार कुलकर्णी आणि दिनेश चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. अंकुश महाजन यांनी निर्मिती व्यवस्थापन पाहिले, तर निकेत पावसकर, अमेय नर आणि राजेश देसाई यांनी प्रसिद्धीसाठी विशेष मेहनत घेतली. ही दत्त आरती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रसिकांकडून या गीताला भरभरून दाद मिळत आहे. ‘द्रौपदी क्रिएशन्स’च्या युट्यूब चॅनलवर ही आरती उपलब्ध आहे.