डॉ. अनिल सरमळकर यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट
सावंतवाडी । प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाटककार, कवी, लेखक आणि दिग्दर्शक, कोकणचे सुपुत्र डॉ. अनिल जिजाबाई कांबळे-सरमळकर यांच्या आगामी ‘बिग बजेट’ चित्रपटाचे नाव ‘सनी बँकर’ (Sunny Banker) वरून आता ‘लमान’ (Lamaan) असे निश्चित करण्यात आले आहे. या नामकरणामुळे या भव्य प्रकल्पाभोवतीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील एका लहानशा खेड्यातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या इंग्रजी लेखनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आलेले डॉ. अनिल कांबळे-सरमळकर आता आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात लेखक-दिग्दर्शक म्हणून उतरण्याचे धाडस करत आहेत. या बिग बजेट आणि बिग स्टारर चित्रपटाची संकल्पना पाहता बॉलिवूडमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांची या चित्रपटातील अपेक्षित भूमिका हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण असले तरी, या चित्रपटाची कथा, तसेच एका छोट्या गावातून सामान्य पार्श्वभूमीतून आलेले अनिल सरमळकर आणि त्यांची अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची अनेक वर्षांची इच्छा, तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलण्याचे धाडस यामुळे या भव्य चित्रपट प्रकल्पाकडे संपूर्ण बॉलिवूडमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका केवळ एकच नसून, आजवर त्यांनी कधीही साकारल्या नाहीत अशा विविध भूमिका या चित्रपटात पाहता येणार आहेत. डॉ. अनिल सरमळकर यांनी याबद्दल बोलताना विनम्रपणे सांगितले की, “मी केवळ नटश्रेष्ठ महानायक अमिताभ यांनाच समोर ठेवून या भूमिका लिहिल्या आहेत. या भूमिका गेली अनेक वर्षे माझ्या मनात ठाण मांडून होत्या, त्या आता निदान लिहून पूर्ण झाल्या आहेत. मात्र, जर त्या प्रत्यक्ष पडद्यावर आणि त्याही अमिताभ यांनी अभिनीत केल्या तर तो माझ्या कलाजीवनाचा सर्वोच्च यशबिंदू असेल.”
फिलिपाइन्स इंटरनॅशनल फिल्म्स (Philippines International Films) या आंतरराष्ट्रीय प्रॉडक्शन हाऊसने ‘लमान’ चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली असून, बॉलिवूडमधील अन्य दोन नामवंत स्टुडिओ या निर्मितीसाठी लवकरच सहभागी होत आहेत.
या चित्रपटाची पूर्वतयारी गेली तीन वर्षे सुरू असून, या चित्रपटकथेचे लेखक डॉ. अनिल सरमळकर यांनी या पटकथेवर गेली पाच वर्षे काम केले आहे. डॉ. अनिल सरमळकर यांचा पहिला लघुपट ‘स्मॉल ब्रोकेन गॉड’ (Small Broken God) हा २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांच्या या पहिल्याच लघुपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरिस शॉर्ट फेस्टिव्हलमध्ये विशेष प्रयत्न म्हणून दखल घेण्यात आली आहे. कोकणातील पहिला मराठी चित्रपट ‘काहूर’ ची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनही अनिल कांबळे-सरमळकर यांनी केले असून, हा चित्रपट अद्याप प्रदर्शनाच्या प्रक्रियेत आहे. दरम्यान, डॉ. अनिल सरमळकर आपल्या इंग्रजी साहित्य लेखनामुळे आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशात आले आहेत.
‘लमान’ हे अत्यंत आव्हानात्मक असे कलाकार्य आहे. डॉ. अनिल सरमळकर या प्रकल्पाबद्दल म्हणतात की, “ती एक स्वप्नवत भव्य कलाकृती आहे. हे माझ्यासाठी एक खडतर शिवधनुष्य आहे.”
‘लमान’ ही एक अद्भुतिका आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर भारतीय चित्रपटातील तो एक ‘माईलस्टोन’ ठरेल. भारतीय चित्रपट रंगभूमीवरील कलाकार, तसेच परदेशातील कलाकार आणि तंत्रज्ञ या प्रकल्पात सहभागी होणार असल्याचे सांगताना अनिल सरमळकर यांनी पुढे सांगितले की, “माझे साहित्य, नाट्य आणि कविता लेखन यातही मी नेहमीच भव्य व वेगळे विषय हाताळले आहेत. त्याप्रमाणेच मला हा चित्रपटही भव्य करायचा आहे असे मी स्वप्न पाहिले आहे.”
‘लमान’मधील अपेक्षित असणारी महानायक अमिताभ बच्चन यांची आगळीवेगळी सशक्त भूमिका आणि चित्रपटाची कथा, तसेच संपूर्ण चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय दर्जा इत्यादी या प्रकल्पाच्या भव्य बाजू आहेत. ‘सनी बँकर’ हे फर्स्ट स्टँड टायटल आता बदलत असून, त्याचे रूपांतर ‘लमान’ असे होत आहे.












