संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद : पोलिसांची पथके जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर तपासासाठी रवाना
सावंतवाडी | प्रतिनिधी: बुधवारी रात्री सावंतवाडी शहरात धुमाकूळ घालणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सावंतवाडी पोलिसांची पथके जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कसून तपास करत आहेत. शहरातील मोक्याच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, काही फुटेजमध्ये संशयित निदर्शनास आले आहेत. यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे.
गोवा-कळंगुट येथील टॅक्सीचालकावर प्राणघातक हल्ला करून त्याची टॅक्सी घेऊन सावंतवाडीत पळालेल्या चोरट्यांनी येथे घरफोडीचा प्रयत्न केला, दोन मोबाईल चोरले आणि दोन दुचाकी घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात घरफोडी, मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरी असे तीन स्वतंत्र गुन्हे अज्ञात व्यक्तींविरोधात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गोवा आणि सावंतवाडी पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त शोधमोहिमेनंतरही चोरट्यांना पळून जाण्यात यश आले होते.
सीसीटीव्ही फुटेज तपासावर भर
सावंतवाडी शहरात झालेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील खासगी आणि शासकीय सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी सुरू केली आहे. गोवा येथे टॅक्सीचालकावर झालेल्या हल्ल्यापासून ते सावंतवाडीतील घरफोडी आणि दुचाकी चोरीपर्यंतच्या घटनाक्रमाचे धागेदोरे सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधले जात आहेत. काही ठिकाणी फुटेजमध्ये संशयित व्यक्ती दिसून आल्या असून, त्या दिशेने तपास गतीने सुरू आहे. पोलिसांनी विश्वास व्यक्त केला आहे की, तांत्रिक तपासानंतर लवकरच चोरट्यांना ताब्यात घेण्यास यश मिळेल.
चोरट्यांनी टॅक्सी सोडून दिली आणि पळ काढला. मालपे राष्ट्रीय महामार्गावर असलेली ही अर्टिगा टुरिस्ट गाडी पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सावंतवाडीत दुचाकी आणि मोबाईल चोरी: टॅक्सी सोडून दिल्यानंतर चोरट्यांनी खासकिलवाडा परिसरातून दोन दुचाकी चोरल्या. यात हेल्थ पार्क परिसरातील मिनल भिरमुळे यांची दुचाकी आणि तेथे झोपलेल्या दोन कामगारांचे मोबाईल यांचा समावेश आहे. तसेच ज्यूस्तीनगर येथील पॉवलीन रॉड्रिग्स यांचीही दुचाकी चोरट्यांनी पळवली. तर जेलनजीकच्या एका बंगल्यात घरफोडीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरलेल्यांपैकी एक दुचाकी कणकवली, सावडाव येथे आढळून आली असून, दुसऱ्या दुचाकीचा शोध सुरू आहे.











