आचारसंहितेच्या काळात डम्पिंग ग्राउंडसाठी जागा खरेदी होतेच कशी ?

कोत्रेवाडी ग्रामस्थांचा सवाल, प्रशासनाच्या भूमिकेवर उठवले प्रश्नचिन्ह

संतोष कोत्रे
लांजा – कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंडसाठीची नियोजित जागा नियम २०१६ च्या निकषानुसार क्षेपणाभूमीसाठी योग्य नाही, असे पत्र दस्तूरखुद्द जिल्हा प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांनीच फेब्रुवारी २०२१ मध्ये लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेले असतानाही पुन्हा कोत्रेवाडी जागेचा प्रस्ताव स्वीकारला जातोच कसा? असा थेट सवाल करत कोत्रेवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या, अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे वाडीवस्तीलगत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र हा प्रकल्प राबवताना शासकीय नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत शासकीय रस्ता नाही. जवळच जलस्त्रोत आहेत.वाडी अवघ्या १८० ते २०० मीटरवर आहे. आणि त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कोत्रेवाडी येथील नियोजित जागा ही नियम २०१६ च्या निकषानुसार क्षेपणाभूमी अर्थात डम्पिंग ग्राउंडसाठी योग्य नाही असे जिल्हा निवड समितीच्या अहवालावरून स्पष्ट होते.असे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांनीच फेब्रुवारी २०२१ मध्ये लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. तर मार्च २०२१ मध्ये जिल्हा निवड समितीने नाकारलेला कोत्रेवाडी येथील जागेचा प्रस्ताव रद्द केल्याचे पत्र नगरपंचायती कडून ग्रामस्थांना देण्यात आले होते .

असे असताना देखील सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड जागेचे नगरपंचायतीने खरेदीखत केले होते.म्हणजे एकीकडे जिल्हा प्रशासन अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कोत्रेवाडी येथील जागा ही निकषानुसार योग्य नाही असे पत्र देतात आणि दुसरीकडे २०२४ मध्ये याच जागेची डंपिंग ग्राउंड साठी खरेदी केली जाते. त्यामुळे नगर पंचायतीला आंचार संहिता लागू होत नाही का? असा प्रश्न कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे यातच सारे गौडबंगाल असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे .रस्ता नसेल ,जल स्त्रोत असतील तर जागेचे खरेदीखत केलेच कसे? त्याचप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालयाने या जागेतील तीन गटांच्या हद्दी खुणा देखील निश्चित केलेल्या नाहीत. डम्पिंगसाठी खरेदी केलेल्या जागेच्या जर हद्दी खुणांच निश्चित झालेल्या नसतील तर खरेदीखत केले कसे? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.एकूणच या संपूर्ण प्रकारात आर्थिक गौडबंगाल झाल्याचा आरोप कोत्रेवाडी ग्रामस्थांनी केलेला आहे .