फुरूस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर मोठा निर्णय

 

फजलुद्दीन परकार उर्फ काका यांची प्रभारी सरपंचपदी नियुक्ती

खेड । प्रतिनिधी : फुरूस ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती. रूकीया लियाकत सनगे यांची प्रशासकीय व आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे सरपंच व सदस्य पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा निर्णायक आदेश कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) अंतर्गत पारित करण्यात आला.

 

विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशीत समोर आले आहे की, सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीत ग्रामपंचायतीकडून १५ वा वित्त आयोग व जिल्हा वार्षिक जनसुविधा योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या संरक्षण भिंत आणि रस्त्याच्या कामांमध्ये नियमबाह्य पद्धतीने निविदा प्रक्रिया न पूर्ण करताच काम सुरू करण्यात आले. तसेच, काही प्रकरणांत आराखड्यातील मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्चही केल्याचे स्पष्ट झाले.

 

या कामांसाठी केलेले ठराव, निविदा प्रक्रिया, करारनामे यामध्ये असलेली विसंगती, तसेच मागील तारखांनी दस्तऐवज सादर करून नियम मोडल्याच्या आधारे, विभागीय आयुक्तांनी रूकीया सनगे यांची तत्काळ पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले. यासोबतच संबंधित ग्रामसेवकांवरही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, असे आदेशात नमूद आहे.

 

दरम्यान, सरपंच पद रिक्त झाल्याने फुरूस ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. फजलुद्दीन इब्राहिम परकार उर्फ काका यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्तीही शासकीय आदेशानुसार झाली असून, त्यांनी सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. फजलुद्दीन परकार उर्फ काका हे ग्रामपंचायतीच्या कारभारात सक्रिय असून, त्यांना १५ वर्षाचा ग्राम पंचायतीचा अनुभव आहे. रस्ते, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आतापर्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रभारी सरपंचपदी नियुक्ती झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करत गावाच्या प्रगतीसाठी विश्वास व्यक्त केला आहे. या घडामोडींमुळे फुरूस ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणि शिस्त येण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.