सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस यंदा त्यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी, म्हणजेच १६ जुलै रोजी सावंतवाडी येथे साजरा केला जाणार आहे. शिवसेना आणि नामदार दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी ही माहिती दिली.
बाबू कुडतरकर यांनी सांगितले की, आमदार केसरकर १६ जुलै रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर येथे कार्यकर्ते आणि शुभचिंतकांना भेटून शुभेच्छा स्वीकारणार आहेत. आमदार केसरकर त्यांच्या वाढदिवसाच्यादिवशी, म्हणजे १८ जुलै रोजी शासकीय कामांमध्ये व्यस्त असणार असल्याने, वाढदिवस दोन दिवस अगोदर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांना पुष्पगुच्छ किंवा कोणतीही भेटवस्तू न आणण्याचे आवाहन बाबू कुडतरकर यांनी केले आहे. त्याऐवजी, केवळ गुलाब पुष्प आणल्यास चालेल, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे. शुभेच्छा स्वीकारण्याच्या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे, अशी माहितीही कुडतरकर यांनी दिली.
यावेळी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, ललिता सिंग, संजय गावडे, अर्चित पोकळे, सुजित कोरगावकर, प्रकाश बिद्रे, विश्वास घाग, विनोद सावंत, एकनाथ हळदणकर, दत्ता सावंत, शैलेश मेस्त्री, बबन शेळके, विनायक म्हाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.












