मुंबई-गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघात; वृद्ध महिला गंभीर जखमी

खेड । प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावर भरणे येथील शिंदेवाडी परिसरात जाधव पेट्रोल पंपासमोर बुधवारी पहाटे ४:१३ च्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून सावर्डेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका खाजगी कारच्या (क्रमांक MH 47 K 0737) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या कारमध्ये दोन प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये जयश्री नंदकुमार पंडित (वय ६२, रा. सावर्डे) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
रुग्णवाहिका धावली मदतीला
अपघाताची भीषणता पाहून स्थानिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली ‘जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान’ची २४ तास विनामूल्य रुग्णवाहिका अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमी जयश्री पंडित यांना तातडीने गाडीत घेऊन कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पहाटेची वेळ असूनही संस्थानच्या रुग्णवाहिकेने दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी महिलेला वेळेवर उपचार मिळण्यास मोठी मदत झाली आहे.