मसुरे | झुंजार पेडणेकर : प्रतिभा फिशरीज डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित सिंधुदुर्ग व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गोळवण येथे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग श्री सागर कुवेसकर, श्री बहर महाकाल जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सिंधुदुर्ग, श्री. केदार पालव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
राष्ट्रीय मत्स्य शेती दिवस साजरा करणे तसेच या व्यवसायातील यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे या व्यवसायासाठी संभाषण संधी व भविष्यातील वाटचाल या विषयावर चर्चा करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्देश होते.
यावेळी सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गाचे सुपुत्र श्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन त्यांचेही आभार मानले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्र्यांच्या सहकार्यातून शोभिवंत मत्स्यपालनाला सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुवर्ण दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला .
प्रतिभा फिशरीज डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित सिंधुदुर्ग हि संस्था 2014 पासून कार्यरत आहे .सध्या या संस्थेला 50 मत्स्यपालक जोडलेले असून एकूण 300 मत्स्य पालक करण्याचे उद्दिष्ट या संस्थेने दर्शविले. तसेच देशपातळीवर चालणाऱ्या मत्स्य व्यवसायातील दहा टक्के वाटा हा सिंधुदुर्गाचा असावा असा विश्वास या संस्थेने व्यक्त केल्या आहे.
यावेळी मत्स्य पालकांचा सन्मान करण्यात आला श्री हनुमंत भास्कर नाईक हे या जिल्ह्यातील प्रथम व्यक्ती आहेत ज्यांनी शोभिवंत मत्स्य पालन व्यवसायाला सुरुवात केली व मागील सोळा सतरा वर्ष ते हा व्यवसाय यशस्वी करत आहेत. श्री चंद्रकांत यशवंत भालेकर ,श्री. बाळकृष्ण लक्ष्मण शिंदे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
श्री केदार पालव यांनी कांदळवन संवर्धन व मत्स्यपालन यासाठी मिळणारी शासनाची सवलत तसेच संवर्धनाची गरज आपल्या मनोगत व्यक्त केली. तर श्री बहर महाकाल यांनी व्यवसाय पूरक ज्ञान व मार्गदर्शन केले , तसेच वेळोवेळी लागणाऱ्या सहकार्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले श्री. सागर कुवेसकर यांनी मत्स्य शेती बद्दल माहिती दिली तसेच शासनाच्या योजनांची आर्थिक बाबींची माहिती देऊन भविष्यात वेळोवेळी सहकार्याची ग्वाही दिली. व असेच कार्यक्रम होऊन नवनवीन शेतकरी मत्स्य शेतीकडे वळतील याकडे या संस्थेने प्रयत्न करावेत असे सुचविले.
उपस्थित यांचे प्रतिभा फिशरीज संस्थेने आभार मानले.











