मित्रांच्या जीवाशी खेळ करत समुद्रकिनारी थार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी मित्रांच्या जिवितास धोका निर्माण होईल अशा रितीने थार गाडी चालवणार्‍या चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 9 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वा.सुमारास घडली.
भूषण गजानन भेलेकर (20,रा.मालेगाव,नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल संग्राम झांबरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी संशयित चालक भूषण भेलेकर हा आपल्या ताब्यातील थार (एमएच-40-सीएक्स-8262) गाडीतून मित्रांसोबत भाट्ये समुद्रकिनारी गेला होता. त्याठिकाणी तो गाडीतून समुद्रकिनारी फेर्‍या मारत असताना त्याची गाडी वाळुमध्ये रुतली. ही बाब तेथील नागरिकांनी भाट्ये चेकपोस्टवरील अंमलदार संग्राम झांबरे यांना कळवली. त्यांनी घटनास्थळी जाउन पाहिल्यावर त्यांना थार गाडी वाळू व पाण्यामध्ये चालवल्यामुळे त्याठिकाणी रुतलेली दिसून आली. याप्रकरणी चालक भूषणने गाडीतील मित्रांच्या जिवितास धोका निर्माण होउ शकतो. हे माहित असूनही हयगयीने व अविचाराने कृती केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.